नवी मुंबई : उरण रेल्वेमार्गाचे रूळ जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याकरिता नेरूळ ते पनवेल मार्गावरील रेल्वे वाहतूक सोमवार दुपारपर्यंत बंद करण्यात आली होती. यामुळे रेल्वे प्रवाशांचे होणारे हाल टाळण्यासाठी सदर मार्गावर एनएमएमटीच्या ५० जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या.उरण रेल्वेमार्गातील सर्व अडथळे दूर झाल्याने अंतिम टप्प्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. नेरूळ व सीबीडी येथून उरण मार्गावर लोकल धावणार आहे. त्याकरिता सीवूड स्थानकादरम्यान काही ठिकाणी रूळ तोडून उरण मार्गाला जोडले जाणार आहेत. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या कामासाठी नेरूळ ते पनवेल मार्गावरील रेल्वेचा ब्लॉक घोषित करण्यात आला होता. त्यानुसार रविवार ते सोमवार दुपारपर्यंत २४ तासांकरिता ब्लॉक घोषित करून रूळ जोडणीचे काम सुरू होते. सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत नेरूळ ते पनवेल मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरू होणार होती. परंतु अपेक्षित वेळेत काम पूर्ण न झाल्यामुळे संध्याकाळपर्यंत रेल्वे वाहतुक सुरू झालेली नव्हती. परिणामी पनवेल व नेरूळ दरम्यान प्रवास करणाºया रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. दोन्ही स्थानकांमध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. त्यामध्ये चाकरमान्यांसह ख्रिसमसनिमित्ताने घराबाहेर पडलेल्यांचा अधिक समावेश होता. दरम्यान ब्लॉक घोषित झाला तेव्हाच रेल्वे प्रवाशांचे संभाव्य हाल लक्षात घेऊन एनएमएमटीने ज्यादा बस सोडण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार सोमवारी सकाळी पाच वाजल्यापासून नेरूळ ते पनवेल मार्गावर ५० हून अधिक जादा बस सोडण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला. संध्याकाळी नेरूळ स्थानकाबाहेर प्रवाशांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यांना निश्चित स्थळी जाणाºया बसची माहिती देण्याकरिता एनएमएमटीचे कर्मचारी नेमण्यात आले होते. त्याशिवाय गर्दीमध्ये अनपेक्षित प्रकार घडू नये याकरिता स्थानकाच्या परिसरात पोलिसांचाही चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. परिवहन सभापती प्रदीप गवस व व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनीदेखील त्या ठिकाणी उपस्थित राहून आढावा घेतला.>रेल्वे बंद असल्याने पनवेल स्थानकात शुकशुकाट पसरला होता. नेहमी वर्दळ असलेल्या स्थानकाबाहेरील जागेत प्रवासी व रिक्षांची गर्दी कमी झाली होती. तर ज्या प्रवाशांना रेल्वे बंद असल्याचे माहीत नव्हते, त्यांना मात्र तासन्तास स्थानकात बसून रेल्वे सुरू होण्याची वाट पाहावी लागली.
रेल्वे प्रवाशांच्या मदतीला एनएमएमटी, उरण रेल्वेमार्गाच्या रुळाचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 2:49 AM