नवी मुंबई : नवी मुंबईकरांना सुखकर आणि आरामदायी प्रवास करता यावा, यासह शहरांतील वाहनांपासूनचे प्रदूषण कमी करण्यासाठी २०२४-२५च्या अर्थसंकल्पात नवी मुंबई परिवहन उपक्रम अर्थात एनएमएमटीने अधिक भर दिला आहे. यानुसार येत्या वर्षभरात एनएमएमटीच्या ताफ्यात १०० सीएनजी आणि १०० इलेक्ट्रिक अशा दोनशे नव्या बस दाखल होणार असल्याची माहिती उपक्रमाचे व्यवस्थापक योगेश कडुसकर यांनी मंगळवारी दिली. एनएमएमटीचा २०२४-२५चा अर्थसंकल्प आयुक्त राजेश नार्वेकर यांना सादर करते वेळी आपल्या निवेदनात त्यांनी ही माहिती दिली.
उपक्रमाच्या तिकिटाच्या दरानुसार महसुली उत्पन्न अर्थसंकल्पात गृहीत धरले आहे. सध्या उपक्रमाकडे वापरात असलेल्या १५४ जुन्या बससह फेमअंतर्गत उपलब्ध १६५ इलेक्ट्रिक बस आणि जीसीसींतर्गतच्या १५१ व जेएनयूआरएमच्या ३५ व्हॉल्व्हो अशा एकूण ५४१ बस कार्यरत आहेत.
येत्या वर्षात २५४ बसपैकी काही बस भंगारात काढल्या जाणार असून, काही देखभाल दुरुस्तीसाठी काढून ठेवाव्या लागणार असल्याने ३५ कोटी उत्पन्न मिळेल, असा अंदाज आहे. याशिवाय इलेक्ट्रिक बसपासून ६९ कोटी रुपये मिळतील, असे गृहीत धरले आहे तर प्रवासी विद्यार्थी पास, प्रासंगिक करार, जाहिरात व इतर बाबींपासून १८ कोटी ६७ लाख असे एकूण १२२ कोटी ६७ लाख उत्पन्न अपेक्षित आहे. तसेच व्हॉल्व्हो बसपासून १३ कोटी, बसवरील जाहिरातींपासून ४० कोटी, जीसीसी बसपासून ४४ कोटी उत्पन्न अपेक्षित धरले आहे.
याशिवाय महापालिकेेकडून ३१५ कोेटी, तर राज्य शासनाकडून ४५ कोटी ३२ लाख, वाशी बसस्थानक विकासातून ४० कोटी ४०३ कोटी ८२ लाख भांडवली उत्पन्न अपेक्षित आहे.
कर्मचारी वेतन, बसस्थानक दुरुस्ती, इंधन, सुटे भाग, वाहनांचा विमा, परवाना, नूतनीकरण, तिकीट छपाई यावर ४६० कोटी ७२ लाख खर्चाची तरतूद केली आहे.
अर्थसंकल्पीय अंदाज घटला२०२३-२४च्या मूळ अर्थसंकल्पात ५२६ कोटी १५ लाख २४ हजार जमा, तर ५२६ कोटी ५ लाख ७५ हजार खर्चासह ९ लाख ४५ हजार शिल्लक असा अंदाज वर्तविला होता. प्रत्यक्षात तिकिटांचे दर न वाढविणे, अवैध प्रवासी वाहतूक, रिक्षा, वाहतूक कोंडी, सीएनएजी, डिझेल, सुटे भागाच्या दरात झालेली वाढ यामुळे मार्च २४ अखेरपर्यंत सुधारित अर्थसंकल्प ५१३ कोटी ४४ लाख ८० हजार जमा आणि ५१३ कोटी ३४ लाख ९४ हजार खर्चासह ९ लाख ८६ हजार शिलकीचा राहील, असा अंदाज आहे.