नवी मुंबई : महानगरपालिका परिवहन उपक्रमाचा २०१९ - २० वर्षासाठी (एनएमएमटी) ३०५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. पुढील एक वर्षामध्ये २५ नवीन बसेस खरेदी करण्यात येणार आहे. तुर्भे आगारामध्ये प्रशासकीय भवन व वाशी बसडेपोचा विकास करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.महानगरपालिकेने २३ जानेवारी १९९६ ला एनएमएमटीची सुरवात केली. उपक्रमाच्या वर्धापनदिनानिमित्त अर्थसंकल्प सादरीकरणासाठी विशेष सभेचे आयोजन केले होते. परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी सभापती रामचंद्र दळवी यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला. गतवर्षी ३३४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. परंतु निर्धारित उद्दिष्ट पूर्ण झाले नसल्यामुळे या सभेमध्ये २७२ कोटी ६५ लाख रुपये खर्चाच्या सुधारित अर्थसंकल्पासही मंजुरी देण्यात आली. २०१९ - २० वर्षासाठी ३०५ कोटी ८५ लाख रुपयांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या अर्थसंकल्पावर परिवहन समितीमध्ये सविस्तर चर्चा होणार असून त्यानंतर या अर्थसंकल्पाला मंजुरी देऊन तो अंतिम मंजुरीसाठी स्थायी समिती व महासभेमध्ये अंतिम मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. एनएमएमटीच्या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाकांक्षी योजनांचा समावेश केला आहे. यामध्ये वाशी सेक्टर ९ मध्ये टर्मिनसचे वाणिज्य बांधकाम करण्यात येणार आहे. तुर्भे आगारामध्ये प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे. पुढील वर्षासाठी २५ नवीन बसेस खरेदी करण्यात येणार आहेत. याशिवाय आयटीएमएस प्रणालीद्वारे स्मार्ट कार्डची अंमलबजावणी करणार आहे.>वर्धापन दिनाचा कार्यक्रम रद्दनवी मुंबई महानगरपालिकेने परिवहन उपक्रमाच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम यावर्षीही रद्द केला. यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर्षीही कार्यक्रम झाला नसल्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिका कर्मचारी कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस शहाजी शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
एनएमएमटीचा ३०५ कोटींचा अर्थसंकल्प सादर, २५ बसेस खरेदी करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 12:57 AM