एनएमएमटीच्या वातानुकूलित प्रवासभाड्यात २५ टक्के कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 02:14 AM2018-02-06T02:14:33+5:302018-02-06T02:15:16+5:30
एनएमएमटीने आपल्या ताफ्यातील वातानुकूलित बसचा प्रवास २५ टक्क्यांनी स्वस्त केला आहे. तर सर्वसाधारण बसच्या तिकीट दरात किरकोळ स्वरूपाची वाढ करण्यात आली आहे.
नवी मुंबई : एनएमएमटीने आपल्या ताफ्यातील वातानुकूलित बसचा प्रवास २५ टक्क्यांनी स्वस्त केला आहे. तर सर्वसाधारण बसच्या तिकीट दरात किरकोळ स्वरूपाची वाढ करण्यात आली आहे. या सुधारित तिकीट दराला मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मंजुरी दिल्याने ७ फेब्रुवारीपासून हे दर प्रत्यक्ष लागू होणार आहेत.
नवी मुंबई महापालिकेची परिवहन सेवा विविध कारणांमुळे तोट्यात आहे. यातच ओला, उबेर टॅक्सींमुळे फायद्यात असलेल्या एनएमएमटीच्या वातानुकूलित बसच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी अधिकाधिक प्रवासी वातानुकूलित बसेसकडे वळावेत, यादृ्ष्टीने या वर्षीच्या अर्थसंकल्पीय बैठकीत काही ठोस निर्णय घेण्यात आले. त्यापैकी वातानुकूलित बसेसचे तिकीट दर २५ टक्क्यांनी कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच सर्वसाधारण बसेसच्या पहिल्या १२ टप्प्यांनंतर प्रत्येक टप्प्यासाठी १ ते २ रुपयांची किरकोळ वाढ सूचित करण्यात आली आहे. या सुधारित तिकीट दराला राज्य शासनाच्या संबंधित विभागाची नुकतीच मंजुरी मिळाली असून बुधवारपासून हे दर प्रत्यक्षात लागू केले जाणार असल्याची माहिती एनएमएमटीचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी ‘लोकमत’ला दिली. वातानुकूलित आणि साध्या बसच्या प्रवासासाठी परतीचे तिकीट घेतल्यास त्यात १0 टक्के सूट मिळेल. हे तिकीट रात्री १२ वाजेपर्यंत ग्राह्य राहील. महापालिका शाळेतील गणवेशधारी विद्यार्थ्यांना परिवहनच्या साध्या बसेसमधून मोफत प्रवासाची सुविधा दिलेली आहे.