एनएमएमटीची आता रिंग रूट सेवा
By admin | Published: August 18, 2015 03:05 AM2015-08-18T03:05:57+5:302015-08-18T03:05:57+5:30
केंद्र सरकारच्या अंगीकृत संस्थेचे दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने आपली सेवा अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा निर्णय घेतला आहे
नवी मुंबई: केंद्र सरकारच्या अंगीकृत संस्थेचे दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने आपली सेवा अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काळात वसाहती आणि स्थानकांना जोडण्यासाठी रिंग रूट सेवा सुरू करण्याचा व्यवस्थापनाचा मानस आहे. सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.
तोट्यात चाललेल्या एनएनएमटीचा कारभार पूर्वपदावर आणण्यात व्यवस्थापनाला काही प्रमाणात यश आले आहे. परिवहनच्या ताफ्यात सध्या वातानुकूलित व साध्या ३०१ बसेस आहेत. या बसेस नवी मुंबईसह मुंबई, ठाणे, कल्याण - डोंबिवली, पनवेल आदी भागांतील ४७ मार्गांवर धावतात. परंतु यातील लांब पल्ल्याचे अनेक मार्ग तोट्यात असल्याने व्यवस्थापन हे मार्ग बंद करण्याच्या विचारात आहे. त्याला पर्याय म्हणून शहरातील वसाहतींना व स्थानकांना जोडणारे छोटे मार्ग अर्थात रिंग रूट सुरू करण्याची उपक्रमाची योजना आहे.
केंद्र शासनाच्या जे.एन.एन.यू.आर.एम.ए. योजनेअंतर्गत परिवहन उपक्रमाला ६० मिडी बसेस मिळणार आहेत. त्यापैकी १० बसेस गेल्या आठवड्यात उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून या बसेस रस्त्यावर धावणार आहेत. रिंगरूटवर या मिडी बसेस चालवल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी)