नवी मुंबई : एनएमएमटीचा तोटा भरून काढण्यासाठी तिकीट दर वाढविण्याचा निर्णय परिवहन उपक्रमाने घेतला आहे. ५ जुलैपासून साध्या बसेसच्या पहिल्या टप्प्यासाठी ५ ऐवजी ७ व वातानुकूलित बसेससाठी १५ ऐवजी २० रुपये दर आकारण्यात येणार असून पुढील टप्प्यांचे दरही त्याच प्रमाणात वाढणार आल्याने प्रवाशांना भुर्दंड सहन करावा लागणार आहे.नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमामध्ये ३६० बसेस आहेत. महापालिका क्षेत्रासह मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, खारघर, कळंबोली, पनवेल, उरण या भागांत ५१ व वातानुकूलित ६ अशा ५७ मार्गांवर बसेस धावत आहेत. उपक्रमाला प्रतिकिलोमीटर ३८.१५ रुपये एवढे उत्पन्न मिळत आहे. परंतु प्रतिकिलोमीटर ५४.१ रुपया खर्च होत आहे. प्रतिकिलोमीटर १५.८६ रुपये एवढा तोटा सहन करावा लागत आहे. सद्यस्थितीमध्ये महिन्याला ३ कोटी रुपयांचा तोटा होत आहे. पालिकेने सप्टेंबर २०१२ मध्ये भाडेवाढ केली होती. तेव्हा डिझेलचे दर ४४.२९ रुपये व सीएनजीचे दर ३३.४१ रुपये एवढे होते. आता हेच दर अनुक्रमे ७२.४५ व ६०.२० रुपये एवढे झाले आहे. महापालिकेने यापूर्वीच दर वाढविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु सर्वसाधारण सभेने विरोध केल्यामुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. अखेर पुन्हा भाववाढीचा निर्णय घेतला.एनएमएमटीच्या साध्या बसेसला पहिल्या टप्प्यासाठी पूर्वी ५ रुपये तिकीट होते आता ७ रुपये आकारण्यात येणार आहे. वातानुकूलित बसला १५ रुपये तिकीट होते, आता २० रुपये मोजावे लागणार आहे. तोटा भरून काढण्यासाठी हा निर्णय घेतला असला तरी त्याचा फटका प्रवाशांना बसणार आहे. (प्रतिनिधी)
एनएमएमटीचा प्रवास महागला
By admin | Published: July 05, 2015 3:51 AM