पनवेल नगरपरिषदेची एनएमएमटीला नाहरकत
By admin | Published: August 31, 2015 03:22 AM2015-08-31T03:22:53+5:302015-08-31T03:22:53+5:30
नवी मुंबई महापालिकेच्या एनएमएमटीला अखेर पनवेल नगरपरिषदेने ना हरकत दर्शविली आहे. शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे.
पनवेल : नवी मुंबई महापालिकेच्या एनएमएमटीला अखेर पनवेल नगरपरिषदेने ना हरकत दर्शविली आहे. शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे.
नगरपरिषदेवर काही दिवसांपूर्वी कफसह एकूण ५० संस्थानी मोर्चा काढत नगरपरिषदेच्या कामकाजाचा निषेध केला होता. याचे पडसाद याठिकाणी उमटल्याचे पहावयास मिळाले . शहरात नगरपरिषदेची परिवहन सेवा सुरु करण्यात येईल असे यंदाच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले आहे. मात्र अद्याप ही सेवा सुरु झाली नसून शहरातील नागरिकांना परिवहन सेवा उपलब्ध व्हावी यासाठी कफ या संस्थेने शहरात नवी मुंबई म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट कंपनीस परिषदेमार्फत नाहरकत दाखला देण्याची मागणी केली होती . ही मागणी मान्य करीत नगरपरिषद काही अटीवर नवी मुंबई महापालिका परिवहनची बससेवा सुरु करण्याबाबत सकारात्मक असल्याचे समजते. मात्र या वेळी विरोधी पक्षनेते संदीप पाटील यांनी बससेवा सुरु करायची असेल तर त्यांच्यावर अटी किंवा बंधने घालू नयेत अशी सुचना केली आहे. सध्या पनवेल महानगरपालिका स्थापन करण्याचा विषय गाजत असताना कामकाजावर नाराजी व्यक्त करीत खारघर, कळंबोतील रहिवाशांनी पनवेलमध्ये समाविष्ट होण्यास विरोध दर्शविला आहे. अशा वेळी पनवेल नगरपरिषद जवळच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन सेवेची मदत घेण्याचा विचार करत असेल तर पनवेल नगरपरिषदेच्या दृष्टीने नकारात्मक वातावरण करणारे आहे. पीएमटी या बससेवेची घोषणा करुन ती रस्त्यांवर कधी धावणार असा प्रश्न सध्या पनवेलकरांना पडला आहे. शहरात दिशादर्शक फलक लावणे, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहातील रंगमंचाला नाट्यतपस्वी कै. किशोर जोशी यांचे नाव देण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली.