नवी मुंबई : अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी एक वर्षापासून नवी मुंबई महानगरपालिकेकडे करत आहे. पत्रव्यवहारही केला; परंतु प्रशासनाने कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे अनधिकृत होर्डिंग्जला पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष नामदेव भगत यांनी बुधवारी केली. मुंबईमधील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भगत यांनी पत्रकार परिषद आयोजित केली हाेती. गतवर्षी मुंबई-बंगळुरू महामार्गावर पुणे येथे होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेपासून नवी मुंबई महानगरपालिकेकडे अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईसाठी पत्रव्यवहार करत आहे. तत्कालीन आयुक्तांनी पत्रावर कारवाईचा शेराही मारला होता. परंतु, वर्षभरात प्रशासनाने प्रत्यक्षात काहीही कारवाई केलेली नाही. नवी मुंबई परिसरामध्ये अनेक अनधिकृत होर्डिंग आहेत. नियमांची पायमल्ली करून सिग्नलवर व इतर ठिकाणी ती उभी केली आहेत. यामुळे भविष्यात अपघात होण्याची शक्यता आहे. तक्रारी करूनही होर्डिंग्जविरोधात वर्षभरात ठोस कारवाई केली नाही. आता तत्काळ कारवाई सुरू केली नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही नामदेव भगत यांनी दिला.
वर्षभर पाठपुरावा करूनही अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई नाही; नामदेव भगत यांचा प्रशासनावर आरोप
By नामदेव मोरे | Published: May 15, 2024 6:17 PM