चॉकलेट नको, मला सॅनिटायझर हवे!; शाळेत जाण्यापूर्वी मुलांचा हट्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 01:37 AM2021-02-12T01:37:57+5:302021-02-12T01:38:20+5:30
शाळेच्या बॅगेत आता सॅनिटायझर वाढले
- अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : पनवेल तालुक्यात ५वी ते ८वीपर्यंतच्या शाळा २८ जानेवारीपासून सुरू झाल्या आहेत. कोरोनाच्या नियमांचे पालन करीत जिल्हा परिषद, महापालिका शाळा आणि काही प्रमाणात खासगी शाळा सुरू झाल्या आहेत. तर काही शाळा अद्याप बंद आहेत. जनजागृतीमुळे विद्यार्थी शाळेत जाताना, “चॉकलेट नको, मला सॅनिटायझर हवे,” असा हट्ट करीत आहेत. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या बॅगेत आता सॅनिटायझरची बाटली दिसत आहे.
पनवेल तालुक्यात ५वी ते ८वीपर्यंतच्या ४१७ शाळा आहेत. तर ७२ हजार ४५३ विद्यार्थी संख्या आहे. २७ जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचे आदेश असले तरी पनवेल तालुक्यातील बहुतांश शाळा अद्याप बंदच आहेत. तर काही खासगी शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. सुरू झालेल्या शाळांकडून कोरोनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यात येत आहे. मास्क, सॅनिटायझर, वर्गखोल्या निर्जंतुकीकरण करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, थर्मल स्क्रीनिंग, हात धुण्याची व्यवस्था या सर्व बाबी शाळेकडून करण्यात येत आहेत. त्याचबरोबर सॅनिटायझरचाही वापर करण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या बॅगेत सॅनिटायझरच्या प्रमाणात वाढ झाली आहे. शिक्षकांच्या सांगण्यावरून पालकांकडे सॅनिटायझर घेऊन देण्याबाबत हट्ट धरत आहेत. त्यानुसार पालकसुद्धा काळजीपोटी सॅनिटायझर उपलब्ध करून देत आहेत.
शाळा सुरू झाल्यानंतर एकही बाधित नाही
पनवेल तालुक्यातील शाळा सुरू झाल्यापासून एकही विद्यार्थी कोरोनाबाधित झाला नसल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
शाळेतील सर्व वर्ग कोरोना नियमांचे पालन करूनच भरविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांची योग्य ती काळजी शाळांकडून घेतली जात आहे.
विद्यार्थी म्हणतात…. आमच्या वर्गात ४० विद्यार्थी आहेत. पण, सध्या २२ विद्यार्थी येत आहेत. आम्ही एका बाकावर एकच जण बसतो. शाळेत ठिकठिकाणी सॅनिटायझर ठेवण्यात आले आहे. तरीपण मीही सॅनिटायझरची बाटली सोबत घेऊन जातो.
वेदांत पवार, विद्यार्थी
मास्क, हात धुणे, सॅनिटायझर वापरण्यासाठी शिक्षकांकडून वारंवार सूचना करण्यात येतात. त्यामुळे मीही मास्कचा वापर करतो तर बाबांकडून सॅनिटायझर मागून घेतले आहे. त्याचा वापर मी शाळेत करीत आहे. चॉकलेट मला आवडते; पण, या वेळी सॅनिटायझरसाठी पप्पांना सांगितले होते.
- सिद्धांत यादव, विद्यार्थी
शाळा सुरू झाल्या आहेत. मास्कचा वापर तसेच एका बाकावर एकाच विद्यार्थ्यास बसविले जात आहे. मध्यंतरी सुट्टीत तसेच इतर वेळा सॅनिटायझरचा वापर मी करतो आहे. त्यासाठी वडिलांकडून सॅनिटायझरची बाटली मागून घेतली आहे. - संकेत जाधव, विद्यार्थी