आओ जाओ घर तुम्हारा! बस स्थानक, पालिका हद्द, रेल्वे स्थानकात कोठेच तपासणी नाही; सांगा कोरोना रोखणार कसा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 08:09 AM2021-03-19T08:09:24+5:302021-03-19T08:09:57+5:30
पनवेल पालिका क्षेत्रात मोठ्या संख्येने रुग्णसंख्या वाढत असताना प्रशासनाचे कशावरच नियंत्रण नसल्याने वेगवगेळ्या आस्थापनांच्या ठिकाणी सर्रास कोविडचे नियम पायदळी तुडविले जात आहेत.
वैभव गायकर -
पनवेल : पनवेलमध्ये बुधवार, १७ मार्च रोजी २१२ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. पनवेलमध्ये पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. पालिका क्षेत्रात विद्यमान रुग्णांचा आकडा १११० वर पोहोचला आहे. एकूण रुग्णांचा आकडा ३१,८८६ वर पोहोचला असून यापैकी ३०,१२० रुग्ण बरे झाले आहेत तर मृतांचा आकडा ६५६ वर पोहोचला आहे.
पनवेल पालिका क्षेत्रात मोठ्या संख्येने रुग्णसंख्या वाढत असताना प्रशासनाचे कशावरच नियंत्रण नसल्याने वेगवगेळ्या आस्थापनांच्या ठिकाणी सर्रास कोविडचे नियम पायदळी तुडविले जात आहेत. विशेष म्हणजे पालिका परिसरात रात्रीची संचारबंदी पुकारली असतानादेखील पालिका प्रशासन असो अथवा पोलीस प्रशासन कोणाचे कशावरच नियंत्रण नसल्याने ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी स्थिती पालिका हद्दीत निर्माण झाली आहे.
बस स्थानक
मुंबई उपनगर, घाटमाथ्यावरून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी नाही. पनवेल शहरात एसटी बसचे मोठे आगार आहे. या ठिकाणी मुंबई उपनगर, कोंकण तसेच घाटमाथ्यावरील प्रवाशांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. दररोज हजारो प्रवासी या ठिकाणाहून ये-जा करीत असतात; मात्र कोणाचीच तपासणी केली जात नाही. शेकडो गाड्या बस आगारातून सुटत असतात. प्रवाशांची कोणतीही तपासणी केली जात नसून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगही केली जात नाही.
रेल्वे स्थानक
पनवेल रेल्वे स्थानकावर मुंबई, कोंकण तसेच परराज्यातील ट्रेन्स काही वेळा थांबत असतात. पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असल्याने परराज्यातील मजूर वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. लॉकडाऊनमध्ये स्थलांतरित झालेला मजूर वर्ग पुन्हा एकदा राज्यात येत आहे. रोज भरभरून ट्रेन राज्यात येत असताना अशा प्रवाशांना क्वारंटाईन न करता थेट प्रवेश दिला जात आहे.
पालिका सीमा
पालिका सीमेचीदेखील अशीच परिस्थिती आहे. खारघर ते पळस्पे फाट्यापर्यंत काही ठिकाणी पोलीस तैनात केलेले आहेत. मात्र, प्रवाशांची कोणतीही माहिती घेतली जात नाही. विशेष म्हणजे पालिका हद्दीत रात्रीच्या वेळेला संचारबंदी असताना सर्रास वाहनांची ये-जा सुरूच असते. वाहनांची अडवणूक केली जात नाही तर प्रवाशांची तपासणी ही लांबची गोष्ट आहे.
प्रवाशांची तपासणी करण्याच्या सूचना शासनाकडून प्राप्त झालेल्या नाहीत. मात्र, यासंदर्भात पालिका आयुक्त व पोलीस प्रशासनाची समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत कोरोनाचे नियम पायदळी तुडविणाऱ्या आस्थापनांवर कारवाई केली जाणार आहे. कारवाईसाठी यंत्रणा उभारली जाणार आहे. याकरिता पोलिसांना पालिका प्रशासन मनुष्यबळ पुरविणार आहे.
- धैर्यशील जाधव (साहाय्यक आयुक्त, पनवेल महानगरपालिका)