नवी मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथून मुंबईला निघालेले मराठा आंदोलक २५ जानेवारीला नवी मुंबईमध्ये मुक्काम करणार आहेत. आंदोलकांसोबत मोठ्या प्रमाणात दुचाकींसह चारचाकी वाहने आहेत. हे लक्षात घेऊन नवी मुंबई पोलिसांनी आयुक्तालय क्षेत्रात २५ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून २६ जानवारी रोजी रात्री ८ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना प्रवेशास मनाई केली आहे. याशिवाय कोणत्याही रस्त्यावर अशी वाहने उभी करण्यास बंदी केली आहे.
नवी मुंबईच वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी याबाबतची अधिसूचना २३ जानेवारी २०२४ रोजी काढली आहे. २५ जानेवारी मराठा आंदोलक मुक्कामासाठी एपीएमसी मार्केटच्या पाचही बाजारपेठांसह मैदानांचा आधार घेणार आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पहाटे नवी मुंबईमध्येच ध्वजाला सलामी देऊन ते मुंबईकडे रवाना होणार आहेत.
या पार्श्वभूमीवर आंदोलकांसह नवी मुंबईवासीयांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी पोलिसांनी ही खबरदारी घेतली आहे.