खारघर टेकडीवर ‘नो एंट्री’
By admin | Published: June 29, 2015 04:11 AM2015-06-29T04:11:07+5:302015-06-29T04:11:07+5:30
पावसाळ्यात खारघर टेकडीवर होणाऱ्या दरडी कोसळण्याच्या घटना यामुळे पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, तसेच जीवितहानी होण्याची शक्यता असते.
पनवेल : पावसाळ्यात खारघर टेकडीवर होणाऱ्या दरडी कोसळण्याच्या घटना यामुळे पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, तसेच जीवितहानी होण्याची शक्यता असते. या दुर्घटना टाळण्यासाठी सिडको प्रशासनाने ३० सप्टेंबरपर्यंत खारघर टेकडीवर पर्यटकांसाठी प्रवेश बंद केला आहे. मात्र टेकडीवरील चाफेवाडी, फणसवाडी या गावांना यामधून सूट असणार आहे.
नवी मुंबईसारख्या सिमेंटच्या जंगलात खारघर टेकडी हे ठिकाण निसर्गाच्या सान्निध्यात आहे. विशेष म्हणजे या ठिकाणाहून संपूर्ण नवी मुंबई शहराचे विहंगम दृश्य पाहावयास मिळते. सिडकोने याठिकाणी जाण्यासाठी डांबरी रोड केले आहेत. शहरामधील अनेक नागरिक याठिकाणी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येतात. मात्र पावसाळ्यात दरडी कोसळण्यामुळे पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळेच सिडकोने या ठिकाणी प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सिडकोने याठिकाणी सहा सुरक्षारक्षक देखील नेमले आहेत. मात्र काही अतिउत्साही पर्यटक सुरक्षारक्षकांना न जुमानता टेकडीवर प्रवेश करीत असतात, अशा पर्यटकांना रोखण्यासाठी खारघर पोलीस ठाण्याच्या वतीने याठिकाणी दोन कर्मचारी नियुक्त केले आहेत.
शनिवारी, रविवारी या टेकडीवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी पाहावयास मिळते. तरु णांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. मात्र पर्यटकांनी याठिकाणी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन सिडकोचे खारघरमधील प्रशासक प्रदीप डहाके यांनी केले आहे. (प्रतिनिधी)