पनवेल महापालिका हद्दीत सहाआसनी रिक्षांना नो एंट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 01:54 AM2017-12-20T01:54:47+5:302017-12-20T01:54:56+5:30
नियमानुसार महापालिका क्षेत्रात सहाआसनी रिक्षांना प्रवेश करता येत नाही. त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आरटीओ कार्यालयाकडून पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे.
कळंबोली : नियमानुसार महापालिका क्षेत्रात सहाआसनी रिक्षांना प्रवेश करता येत नाही. त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आरटीओ कार्यालयाकडून पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे.
पनवेल तालुक्याची लोकसंख्या कमालीची वाढली आहे. तळोजा, शेडुंग, कर्नाळा, गव्हाण या भागांतून नागरिक पनवेलला येतात. याचे कारण म्हणजे शहरात तहसील, प्रांत, निबंधकांबरोबरच इतर शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे दररोज ग्रामीण भागातून नागरिक येथे येतात. त्यापैकी अनेक जण सहाआसनी रिक्षाने प्रवास करतात. यामध्ये ये -जा करणे खिशाला परवडत असल्याने मिनीडोअरला प्राधान्य दिले जाते. याशिवाय कळंबोली, खांदा वसाहत, नवीन पनवेलमधील रहिवासीही सहाआसनी रिक्षांचा वापर करतात; परंतु नियमानुसार नगरपालिका आणि महापालिका हद्दीत सहाआसनी रिक्षांना नो एंट्री आहे; परंतु पनवेलमध्ये आजही सहाआसनी रिक्षा थेट पनवेल बसस्थानकापर्यंत येतात.
प्रवाशांची सोय होत असल्याने शासकीय यंत्रणाही कडक कारवाई करीत नाही; परंतु त्याचा परिणामी तीनआसनी रिक्षांच्या व्यवसायावर होत आहे. मीटर डाउन न होण्याचे हे एक मुख्य कारण आहे. त्याचबरोबर अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, वाहतूककोंडी आणि इतर अनेक गोष्टी कारणीभूत ठरत आहेत. हॉटेल, मॉल, दवाखान्यांसमोर मोठ्या प्रमाणात वाहने उभे केल्याने वाहतूककोंडी होते. मात्र, तीनआसनी रिक्षा नाक्यांकडे बोट दाखवले जाते, तसेच आमच्यावर नियमाच्या चौकटीत व्यवसाय करण्याचे बंधन आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून घातले जाते. मग इतर वाहनांवर का कारवाई होत नाही, ते नियमांची पायमल्ली करतात तरीही त्यांना व्यवसाय करू दिला जातो हे तीनआसनी रिक्षाचालकांचे गाºहाणे आहे.
या सर्व गोष्टींचा विचार करून पनवेल उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मागील आठवड्यात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी कारवाईला सुरुवात केली आहे. गणवेश, कागपत्रांबरोबरच महापालिका हद्दीत प्रवेश केल्याबद्दल सहाआसनी रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या मोहिमेच्या माध्यमातून आरटीओ कार्यालयाकडून सूचक इशारा देण्यात आला आहे.