पनवेल : अतिवृष्टीमुळे कर्नाळा अभयारण्यात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. अभयारण्यात विविध ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने यामुळे कर्नाळा किल्ल्यावर जाण्यासाठी असलेल्या पायवाटेसाठीही अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे वनविभागाने शुक्रवार, ९ आॅगस्टपर्यंत पर्यटकांना कर्नाळा अभयारण्यात येण्यास मज्जाव केला आहे.पावसाळ्यात वर्षासहलीसाठी कर्नाळा अभयारण्याला पर्यटकांकडून नेहमीच पसंती दिली जाते. सुट्टीच्या दिवशी तर या ठिकाणी हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल होत असतात. रायगड जिल्ह्यातील अनेक प्रमुख धबधब्यावर प्रवेश बंदी करण्यात आल्याने गेल्या काही दिवसांत पर्यटकांच्या संख्येत आणखीनच भर पडली आहे. मात्र, रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे कर्नाळा अभयारण्यात भूस्खलन झाले असून मोठे नुकसान झाले आहे.येथील प्रसिद्ध मयूर बंधारा पूर्णपणे मातीने भरल्याने सर्व परिस्थितीत पूर्ववत करण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे ९ आॅगस्टपर्यंत या ठिकाणी पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी पी. पी. चव्हाण यांनी दिली. कर्नाळा अभयारण्यात उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीचा अहवाल चव्हाण यांनी उपवनसंरक्षक वन्यजीव ठाणे यांना दिल्यानंतर त्यांनी सर्व कामे सुरळीत करण्यासाठी ९ तारखेपर्यंत अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्याच्या घडीला किल्ल्यावर निर्माण झालेला अडथळा दूर करण्यासाठी साफसफाईची कामे हाती घेण्यात आली आहेत. विविध ठिकाणी उन्मळून पडलेली झाडे बाजूला करण्याचे कामही सुरू असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
कर्नाळा अभयारण्यात पर्यटकांना ‘नो एंट्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 2:50 AM