मंडप उभारणीकरिता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही

By नारायण जाधव | Published: August 24, 2022 05:33 PM2022-08-24T17:33:59+5:302022-08-24T17:34:20+5:30

सामाजिक आरोग्य रक्षणाच्या दृष्टीने मागील 2 वर्षांपासून कोव्हीड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने विसर्जन स्थळावर होणारी गर्दी टाळण्यासाठी आठही विभागांमध्ये मोठ्या संख्येने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली होती.

No fee will be charged for setting up the mandap | मंडप उभारणीकरिता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही

मंडप उभारणीकरिता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही

Next

नारायण जाधव

नवी मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार श्रीगणेशोत्सवामध्ये मंडप उभारणीकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी जाहीर केला असून त्याचे सर्व गणेशोत्सव मंडळांमार्फत स्वागत केले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने गणेशोत्सवामध्ये मंडप उभारण्याकरिता परवानगी मिळण्यासाठी अर्ज करण्यास 14 जुलैपासून ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली असून आत्तापर्यंत 164 मंडळांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये बेलापूर विभागात 28, नेरुळ विभागात 21, वाशी विभागात 17, तुर्भे विभागात 17, कोपरखैरणे विभागात 39, घणसोली विभागात 09, ऐरोली विभागात 24 व दिघा विभागात 09 असे एकूण 164 परवानगी अर्ज प्राप्त झाले आहेत. मंडळांच्या सोयीकरिता प्रत्येक विभाग कार्यालयात परवानगीसाठी विशेष कक्ष स्थापन केला असून मंडळांना विहित कालावधीत परवानगी मिळावी याची खबरदारी घेतली जात आहे.

मागील वर्षी कृत्रिम तलावामध्ये श्रीमूर्ती विसर्जनाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. गतवर्षी एकूण 27808 इतक्या विसर्जित श्रीगणेश मूर्तींपैकी कृत्रिम तलावात 14090 इतक्या मोठ्या संख्येने श्रीमूर्ती विसर्जित करून नवी मुंबईकर नागरिकांनी आपल्या पर्यावरण विषयक जागरुकतेचा प्रत्यय दिला. महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानामध्ये नवी मुंबई हे राज्यातील प्रथम क्रमांकाचे पर्यावरणशील शहर म्हणून मानांकित असून यामध्ये जागरुक नवी मुंबईकर नागरिकांचा मोलाचा वाटा आहे. हीच जागरुकता कृत्रिम तलावातील श्रीगणेश मूर्ती विसर्जनाला दाखवत जलप्रदूषणाला प्रतिबंधाची महापालिकेची भूमिका नागरिकांनी उचलून धरली.

याशिवाय तलावातील जलप्रदूषण रोखण्यासाठी 14 मुख्य तलावातील जलाशयाच्या साधारणत: 30 टक्के भागात नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत गॅबियन वॉल उभारण्यात आल्या असून या विशिष्ट क्षेत्रात नागरिकांनी श्रीमूर्ती विसर्जन करावे या आवाहनासही सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे. सामाजिक आरोग्य रक्षणाच्या दृष्टीने मागील 2 वर्षांपासून कोव्हीड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने विसर्जन स्थळावर होणारी गर्दी टाळण्यासाठी आठही विभागांमध्ये मोठ्या संख्येने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली होती. यावर्षीही 134 कृत्रिम तलावांच्या जागा परिमंडळ व अभियांत्रिकी विभागामार्फत निश्चित करण्यात आल्या असून त्याठिकाणी कृत्रिम तलाव उभारणीचे काम सुरु करण्यात आले आहे.

यामध्ये बेलापूर विभागात 16, नेरुळ विभागात 25, वाशी विभागात 16. तुर्भे विभागात 20, कोपरखैरणे विभागात 14, घणसोली विभागात 18, ऐरोली विभागात 16 व दिघा विभागात 9 अशाप्रकारे एकूण 134 कृत्रिम विसर्जन तलाव उभारले जात आहेत. अशाप्रकारे पारंपारिक 22 व कृत्रिम 134 अशा 156 विसर्जन स्थळांवर भावपूर्ण वातावरणात श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. श्रीगणेशोत्सव सुनियोजित पध्दतीने संपन्न व्हावा याकरिता महानगरपालिकेच्या सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून सुयोग्य कार्यवाही करावी तसेच विसर्जन स्थळांवरील सुरक्षा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित ठेवावी असे निर्देश आयुक्त बांगर यांनी दिलेले आहेत.

पर्यावरणप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनी श्रीगणेशोत्सवात सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती 4 फूट व घरगुती श्रीगणेशमूर्तीं 2 फूट उंच या मर्यादेत ठेवावी तसेच शक्यतो श्रीमूर्ती शाडूची / पर्यावरणपूरक असेल याची काळजी घ्यावी त्याचप्रमाणे मूर्तीचे विसर्जन घरच्या घरी करावे अथवा नजीकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी करावे. पीओपीची मूर्ती असल्यास त्यांचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे आणि पर्यावरणशील इकोफ्रेन्डली गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन  त्यांनी केले आहे.

Web Title: No fee will be charged for setting up the mandap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.