नवी मुंबई : मनसेच्या पाठपुराव्यानंतर घणसोली स्थानकाबाहेर ‘ना फेरीवाला क्षेत्र’ घोषित करण्यात आले आहे. पालिकेतर्फे सोमवारी त्याठिकाणी १५० मीटरचे सीमांकन आखण्यात आले आहे. यामुळे फेरीवाल्यांनी बळकावलेले पदपथ पादचाºयांसाठी मोकळे होणार आहेत.एल्फिन्स्टन येथील दुर्घटनेनंतर मनसेने अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काही स्थानकांच्या आवारात फेरीवाल्यांची मनसे कार्यकर्त्यांनी हकालपट्टी देखील केली होती. यामुळे वादाची प्रकरणे वाढत असतानाच याचिकेनुसार उच्च न्यायालयाने सर्व रेल्वेस्थानके, धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्था तसेच रुग्णालय परिसरात ना फेरीवाला क्षेत्र जाहीर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याकरिता १०० व १५० मीटरची मर्यादा देखील निश्चित केलेली आहे. त्यानुसार सोमवारी घणसोली रेल्वेस्थानकाबाहेर पालिकेतर्फे सीमांकन करण्यात आले आहे. त्याठिकाणी १५० मीटरची मर्यादा आखून त्या सदरचा भाग ना फेरीवाला क्षेत्र जाहीर करण्यात आला आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांना व पादचाºयांना मोठा दिलासा मिळाला आहे.घणसोली स्थानकाबाहेर दिवस-रात्र पदपथांवर बसणाºया फेरीवाल्यांमुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. अनेकदा वाहतूककोंडी होऊन वादाचे प्रकार देखील घडायचे. त्यामुळे मनसेचे शहर सचिव संदीप गलुगडे यांनी यासंबंधी पालिका, सिडको व रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. सदरचा मार्ग फेरीवालामुक्त करून नागरिकांना त्रासमुक्त करावे अशी त्यांनी मागणी केली होती. त्यानुसार प्रथमच घणसोली स्थानकाबाहेर ना फेरीवाला क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे मोकळ्या जागेवर अनधिकृत फेरीवाले बसणार नाहीत याची खबरदारी प्रशासनाने घेण्याची गरजही गलुगडे यांनी व्यक्त केली आहे.
घणसोली स्थानकाबाहेर ‘ना फेरीवाला क्षेत्र’: मनसेच्या आंदोलनानंतर न्यायालयाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 1:53 AM