मद्यपी चालकांचा परवाना होणार रद्द, चोख बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 04:28 AM2018-12-27T04:28:12+5:302018-12-27T04:28:25+5:30
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाच्या स्वागताचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतो. या उत्साहाच्या वातावरणात शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वाहतूक पोलीस सज्ज झाले आहेत.
पनवेल : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाच्या स्वागताचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतो. या उत्साहाच्या वातावरणात शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वाहतूक पोलीस सज्ज झाले आहेत. परिसरात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. ३१ डिसेंबरला रात्रभर पोलीस गस्तीवर राहणार आहेत. चालकांनी मद्यपान करून वाहन चालवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
वर्षाच्या शेवटच्या रात्री विविध ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले जाते. मद्यपान करून वाहन चालवल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होतात व त्यामुळे काहींचा हकनाक जीव जातो. हे प्रकार रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शहरातील धडक कारवाई सुरू केली आहे. ३१ डिसेंबर रोजी शहरातील महत्त्वाचे चौक, रस्ते, शहराचे प्रवेशद्वार येथे ब्रेथ अॅनालायझरसह पोलीस बंदोबस्तात उपस्थित राहणार आहेत.
नववर्षाच्या स्वागताच्या रात्री सायंकाळपासून प्रत्येक चौकात वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. मोठ्या चौकांमध्ये ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई केली जाणार आहे. दारू पिऊन गाडी चालविणाऱ्यांविरोधात खटले दाखल केले जाणार आहेत. त्यांचे लायसन्सही रद्द करण्यासाठी आरटीओकडे पाठविले जाणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे. ३१ डिसेंबरच्या जल्लोषाला गालबोट लागू नये यासाठी पोलिसांनी देखील कंबर कसली आहे. या वेळी पेट्रोलिंग देखील सुरू राहणार आहे.
पनवेल वाहतूक पोलिसांकडे ३ ब्रेथ अॅनालायझर मशिन, खारघर वाहतूक पोलिसांकडे २ मशिन, तळोजा वाहतूक पोलिसांकडे १ मशिन, नवीन पनवेल वाहतूक पोलिसांकडे २ मशिन, गव्हाण फाटा वाहतूक पोलिसांकडे १ मशिन, कळंबोली वाहतूक पोलिसांकडे ३ ब्रेथ अॅनालायझर मशिन आहेत. पनवेल वाहतूक पोलीस आदई सर्कल, पळस्पेजवळ, कळंबोली पोलीस ८ ठिकाणी, नवीन पनवेल पोलीस ५ ठिकाणी, खारघर पोलीस बेलपाडा, हिरानंदानी व कोपरा गावाजवळ, तळोजा पोलीस आयजीपीएल, धानसर टोलनाका, नावडा फाटा, गव्हाण वाहतूक पोलीस गव्हाण फाटा व पाडेघर येथे ब्रेथ अॅनालायझरसह बंदोबस्त ठेवणार आहेत.
घरी आपले कोणीतरी वाट पाहत आहे त्यामुळे नागरिकांनी स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी दारू पिऊन गाडी चालवू नये, वाहतुकीचे नियम पाळा, असे आवाहन पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते यांनी केले आहे.