नवी मुंबई.:- अण्णासाहेबांचे माथाडी कामगार आणि त्यांची कामगार संघटना माझा जीव का प्राण आहे, जर का माथाडी कामगारांना न्याय मिळत नसेल तर मी गप्प बसणार नाही, सरकार कोणाचेही असो, जोपर्यंत माथाडी कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरुच राहिल, सरकारला आंम्ही विरोध करतच राहू,प्रसंगी त्यांच्या गाड्याही आडवू,येत्या २७ फेब्रुवारीला राज्य सरकारचे अधिवेशन सुरु होत आहे. त्या आधी जर का मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी संबंधित मंत्री आणि अधिका-यांसमवेत संयुक्त बैठका घेऊन माथाडी कामगारांना रास्त न्याय दिला नाहीतर २७ फेब्रुवारीनंतर मोठा लढा उभारू, असा इशारा महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस व शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी एक दिवसीय लाक्षणिक बंदच्या सभेत बोलताना मंगळवारी दिला.
ही सभा नवी मुंबईतील माथाडी भवनसमोर आयोजिली होती. ते पुढे असेही म्हणाले की, राज्यात सत्तेत बदल झाला. हिंदुत्ववादी सरकार आल्यानंतर विविध घटकांच्या ते अपेक्षा पुर्ण करीत आहे, मात्र माथाडी कामगारांनी त्यांच्या मागण्यांची अनेक निवेदने दिली, आंदोलन छेडले, पण गेल्या सहा महिन्याच्या या सरकारच्या कालावधीत माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे.
आमच्या मागण्यां या पगारवाढ किंवा बोनसशी संबंधीत नाहीत तर माथाडी कायद्याचे अस्तित्व अबाधीत रहावे. तसेच महाराष्ट्र राज्यात माथाडी कामगारांची ३६ माथाडी बोर्ड आहेत, या बोर्डामध्ये माथाडी कामगारांच्या मुलांमधून कर्मचारी व अधिका-यांची भरती करावी, त्याचप्रमाणे माथाडी व सुरक्षा रक्षक सल्लागार समितीची पुनर्रचना करावी, माथाडी मंडळाच्या पुनर्रचना करुन त्यावर युनियनच्या सभासद संख्येच्या प्रमाणात सदस्यांच्या नेमणुका कराव्या, अनेक बोगस माथाडी कामगार संघटना सध्या माथाडी कामगारांमधून खंडणी वसुल करीत असून, माथाडी कामगाराच्या हक्काच्या कामात अडथळे आणून कामगारांवर गुंडगिरी करीत आहेत,गेल्या २५ वर्षापासून अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींचा बंदोबस्त केला जात नाही तो करावा. अशा अनेक समस्या असून, याबाबत सरकारने तत्परतेने निर्णय घ्यावा, ही संघटनेची आग्रही मागणी असून, त्याबाबत सरकारने योग्यती पावले उचलावी. लाक्षणिक संपात सहभागी झाल्याबद्दल सर्व व्यापारी-माथाडी कामगारांचे पोलीस यंत्रणा व संबंधितांचे आभारही नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले.
या सभेत बोलताना संघटनेचे कार्याध्यक्ष व आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, नवीन वर्षांची सुरुवात एका लढ्यातुन होत आहे. व पक्ष बाजुला ठेवुन आम्ही लढत आहोत. माथाडी कामगार ही आमची ताकत आहे. ज्या-ज्यावेळी माथाडी कामगारांवर आघात झाला, त्या-त्या वेळी आवाज उठवून कामगारांना संरक्षण कवच निर्माण करुन दिले. आता माथाडी कामगार, व्यापारी यांच्यावर कायदे उलटलेत याविरुध्द ही आजची लढाई आहे. आमची चळवळ माथाडी कामगारांसाठी आहे. आता जर का आम्हाला न्याय मिळाला नाही तर २७ तारखेला अधिवेशन काळात निर्णय घेऊ.
माथाडी कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप म्हणाले की, जेंव्हा बाजार समितीचा कायदा अस्तित्वात आला, तेंव्हा माथाडी कामगारांचा व्यापा-यांविरुध्द लढा होता, पण आतां याचा विचार करणे आवश्यक आहे. सर्व यंत्रणा बिघडली असून,ना व्यापारी सुखी ना माथाडी कामगार,माल आवारात येत नसेल तर बाजार समिती पाहिजे कशाला. सर्व माल नवीमुंबईतील बाजार आवारात आला पाहिजे.
युनियनच्या कायदेशीर सल्लागार अँड्. भारतीताई पाटील म्हणाल्या की, व्यापारी व कामगार हातात हात घालून काम करीत आहेत. हे आजच्या व्यापारी प्रतिनिधी आणि माथाडी कामगारांच्या एकदिवशीय लाक्षणिक बंदच्या सभेचे वैशिष्ट आहे. सरकार कुठेतरी चुकतय असा मला वाटलय अशाही त्या म्हणाल्या.
या सभेचे सूत्रसंचालन माथाडी कामगार यूनियनचे जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख यांनी केले. यावेळी बापूसाहेब भुजबळ, चंद्रकांत ढोले, मोहनभाई गुरनानी, शरद मारू, अमृतलाल जैन कैलासशेठ ताजणे, राजीव मनीयार आदींची भाषणे झाली. सभेला प्राना फाऊंडेशनच्या अध्यक्षा डाॅ.प्राची नरेंद्र पाटील तसेच रविकांत पाटील, सूर्यकांत पाटील, गुंगा पाटील, व्यापारी प्रतिनिधी दत्ता राजपुरे. इरफानभाई अरविंद ढोले, संजयशेठ पिंगळे,मपुर सोनी, भिमजीभाई ,गांगजीभाई भानुभाली, अमरीशभाई बारोट, चंद्रकांत जाधव,जिगर मोहनलाल, महेंद्रभाई दिनेशभाई. काथोकभाई आदी उपस्थित होते.
माथाडी कामगार संघटनेच्यावतिने पुकारण्यात आलेल्या लाक्षणिक संपात बॉम्बे गुडस ट्रान्सपोर्ट असोसिएशन, नव्यामुंबईतील बाजार समितीच्या आवारातील व्यापारी असोसिएशन, किरकोळ व्यापारी असोसिएशन, ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांनी पाठींबा व्यक्त केला. या लाक्षणिक संपात बृहन्मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील विविध व्यवसायातील माथाडी कामगारांबरोबर नाशिक, अहमदनगर, पुळे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, लातूर आदी विभागातील माथाडी कामगार सहभागी झाले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"