भाडेकरूंना नवीन पनवेल नको; घरे सोडून इतरत्र स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:28 AM2019-07-21T00:28:06+5:302019-07-21T00:28:49+5:30
नवीन पनवेल येथील पोस्ट कार्यालयाजवळील पाण्याचे जलकुंभ सिडकोने तीन वर्षांपूर्वी पाडले. यानंतर पाण्याची समस्या आणखीनच बिकट झाली.
वैभव गायकर
पनवेल : धो धो पावसात नवीन पनवेलमधील रहिवासी अपुऱ्या पाणीपुरवठ्याने हैराण झाले आहेत. एकीकडे धरणे ओसंडून वाहू लागली आहेत. तरी नवीन पनवेलमधील पाणीटंचाई कमी होण्याची चिन्हे नाहीत. या समस्येमुळे अनेक रहिवासी नवीन पनवेलमधील आपले घर विकून दुसरीकडे स्थायिक होत आहेत. विशेष म्हणजे, भाडेकरूंनाही नवीन पनवेल नकोसे झाले आहे.
जवळपास दीड लाखांची रहिवासी संख्या असलेल्या नवीन पनवेलला सिडकोमार्फत पाणीपुरवठा केला जातो. इमेजीपीकडून पाणी घेऊन सिडको नवीन पनवेल नोडमध्ये पाणीपुरवठा करते. नवीन पनवेल व खांदा वसाहत या दोन नोडना ४२.२ एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, सध्याच्या घडीला केवळ ३२ एमएलडी पाणीपुरवठा या दोन नोडला होत असल्याची माहिती पाणीपुरवठा अधिकारी राहुल सरोदे यांनी दिली. याचा फटका नवीन पनवेलला सर्वात आहे.
सुमारे दहा एमएलडी अपुरा पाणीपुरवठा भरून काढण्यास सिडको सक्षम नाही, त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. विशेष म्हणजे, सिडकोने उभारलेल्या सेक्टर १३, १८, १७ या वसाहतींमध्ये पाण्याची साठवणूक करण्यासाठी टाक्या नसल्याने या इमारतीमधील रहिवाशांना आपल्या घरात ३००, ५०० लीटरचे पाण्याचे डबे भरून ठेवावे लागत आहेत. सिडकोमार्फत सकाळी ६ ते ९ या वेळेत पाणीपुरवठा करण्याचे निश्चित केले गेले आहे. मात्र, या वेळेतही रहिवाशांना पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप सेक्टर १८ मधील रहिवासी अनिल भोळे यांनी केला आहे. सकाळी ६.३० ते केवळ ८ वाजेपर्यंत पाणीपुरवठा केला जातो. संध्याकाळी ७ च्या सुमारास केवळ १५ ते २० मिनिटे पाणी सिडकोमार्फत सोडले जात असल्याने येथील रहिवासी हैराण झाले आहेत. अनेक भाडेकरू नवीन पनवेलमधील स्थलांतरित होत आहेत. नवीन पनवेल नोड एवढेच भाडे दुसºया नोडमध्ये द्यावे लागत असेल आणि दिवसात एक वेळ मुबलक पुरवठा होत नसेल तर या ठिकाणी थांबूनच फायदा काय आहे? असा संतप्त सवाल भाडेकरू विचारत आहेत. मागील वर्षापासून ही समस्या जैसे थे असल्याने नेमका प्रश्न सुटणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित करीत रहिवाशांनी आपली घरे विक्रीसाठी काढली आहेत. सध्याच्या घडीला शहरात सेक्टर १८, १९, १३, २, १२ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे.
नवीन पनवेल येथील पोस्ट कार्यालयाजवळील पाण्याचे जलकुंभ सिडकोने तीन वर्षांपूर्वी पाडले. यानंतर पाण्याची समस्या आणखीनच बिकट झाली. नवीन जलकुंभ उभारण्यास सिडकोचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ते जलकुंभ बांधून पूर्ण कधी होणार, असा प्रश्न रहिवासी विचारत आहेत.
नवीन पनवेल आणि खांदा वसाहत या दोन्ही नोडमध्ये सुमारे दहा एमएलडी पाण्याचा तुटवडा आहे. एमजेपीच्या वाहिन्या जीर्ण झालेल्या असल्याने जास्त दाबाने पाणी सोडल्यास तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यामुळे पाणीपुरवठा कमी दाबाने करावा लागत आहे. रहिवाशांना सुरळीत पाणी मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. - राहुल सरोदे, पाणीपुरवठा अधिकारी, सिडको