कळंबोली : पनवेल महानगरपालिकेकरिता २४ मे रोजी मतदान होणार आहे. असे असतानाही प्रभाग क्र मांक १७ च्या रचनेबाबत भाजपाचे इच्छुक उमेदवार अॅड. मनोज भुजबळ यांनी थेट सर्वाेच्च न्यायालयात अपील केले आहे. रेल्वेस्थानकाच्या पलीकडील झोपडपट्ट्या वगळाव्यात याकरिता भुजबळ आकांडतांडव करीत आहेत. यावरून भाजपावाले झोपडपट्टीवासीयांच्या विरोधात असल्याचा आरोप शेकापचे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी केला आहे. २४ मे रोजी येथील मतदार संबंधितांना मतपेटीत उत्तर देतील असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे. तर भौगोलिक सलगता नसल्याने आम्ही हरकत घेतली असल्याचे भाजपावाल्यांचे म्हणणे आहे.काही खासगी सोसायट्याही या प्रभागात आहेत. रेल्वेस्थानकाच्या पलीकडील भाग म्हणजे तक्का परिसराचाही समावेश करण्यात आला आहे. या प्रभागाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सर्वाधिक झोपडपट्ट्यांचा समावेश आहे. पंचशीलनगर, नवनाथनगर, इंदिरानगर, मालधक्का या महत्त्वाच्या झोपडपट्ट्या या प्रभागात येतात. रेल्वेस्थानकाचा पूर्व आणि पश्चिम परिसर प्रभाग क्र मांक १७ ला जोडण्यात आलेला आहे. भौगोलिक सलगतेचा मुद्दा उपस्थित करून या प्रभागाच्या रचनेवर भाजपाचे इच्छुक उमेदवार अॅड. मनोज भुजबळ यांनी हरकत घेतली होती. मात्र आयुक्तांनी ती फेटाळली त्यामुळे भुजबळ यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्या ठिकाणी हा मुद्दा टिकला नाही. त्यामुळे त्यांनी या विरोधात सर्वाेच्च न्यायालयात अपील केले आहे. त्याबाबत मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी घेतली जाणार आहे. झोपडपट्टी परिसरात माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांचा प्रभाव आहे. गेली वीस वर्षे नगरसेवक असल्याने त्यांचा दांडगा संपर्क या भागात आहे. त्यामुळे पाटील यांच्याकरिता रेल्वेस्थानकाच्या पलीकडील भाग फायदेशीर आहे. त्यामुळे त्यांनी प्रभाग रचनेवर हरकत घेतली नाही. (वार्ताहर)
प्रभाग क्र मांक १७ च्या रचनेबाबत हरकत दाखल
By admin | Published: April 26, 2017 12:32 AM