महापालिका क्षेत्रात ‘नो पार्किंग’
By admin | Published: November 9, 2016 04:08 AM2016-11-09T04:08:51+5:302016-11-09T04:08:51+5:30
गेल्या काही वर्षांत शहरात वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पार्किंगचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
नवी मुंबई : गेल्या काही वर्षांत शहरात वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पार्किंगचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. नियमित होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. यावर उपाय म्हणून वाहतूक विभागाने संपूर्ण महापालिका क्षेत्रात जवळपास दोनशे ठिकाणांवर नो पार्किंगचा प्रस्ताव आणला आहे. विशेष म्हणजे यात वसाहतीअंतर्गतच्या रस्त्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
शहराची सध्याची लोकसंख्या १३ लाखांच्या घरात पोहचली आहे. त्यानुसार वाहनांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. असे असले तरी शहरात पार्किंगचे नियोजन फसले आहे. वाहन पार्किंगच्या पुरेशा सोयी उपलब्ध नसल्याने वाटेल तेथे वाहने उभी केली जातात.
प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरही दुतर्फा वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. शिवाय वसाहतीअंतर्गतच्या अरुंद रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याने दळणवळणाचा गंभीर प्रश्न उद्भवला आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस व महापालिका प्रशासनाने वाहतूक कोंडी होणाऱ्या शहरातील २0५ ठिकाणी नो पार्किंग, सम-विषय पार्किंग व समांतर पार्किंगचा प्रस्ताव तयार केला आहे. यात प्रमुख रस्त्यांसह वसाहतीअंतर्गतच्या अरुंद रस्त्यांचाही समावेश आहे.
यासंदर्भात नागरिकांच्या सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. सात दिवसांच्या आत नागरिकांनी आपल्या सूचना किंवा हरकती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)