शहरात उद्यान ठेकेदाराकडून दंडवसुली नाही, नवी मुंबईत कामे झाल्याचे दाखवून बिलांना मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 11:56 PM2020-11-06T23:56:27+5:302020-11-06T23:56:53+5:30
Navi Mumbai : शहरात उद्यान, दुभाजाकामधील ट्री बेल्ट, मोकळ्या जागेवर विकसित केलेली हिरवळ मिळू २८० ठिकाणे आहेत. जवळपास ११ लाख चौरस मीटर क्षेत्रफळावर हिरवळ आहे.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : उद्यान विभागातील घोटाळ्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीच ठेकेदाराला पाठीशी घातल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. कामे वेळेत न केल्यास दंड आकारण्याची तरतूद असतानाही उद्यान विभागाने ठेकेदाराला दंड आकारणी केली नाही व बिलांच्या फाइल मंजूर केल्या आहेत. यामुळे मनपाचे आर्थिक नुकसान झाले आहे.
नवी मुंबईमधील सर्वात अनागोंधी कारभार उद्यान विभागामध्ये सुरू आहे. शहरात उद्यान, दुभाजाकामधील ट्री बेल्ट, मोकळ्या जागेवर विकसित केलेली हिरवळ मिळू २८० ठिकाणे आहेत. जवळपास ११ लाख चौरस मीटर क्षेत्रफळावर हिरवळ आहे. शहरातील उद्यानांची देखभाल, दुरुस्ती हा नेहमीच वादाचा विषय राहिलेला आहे. उद्यान विभागातील अधिकारी व कर्मचारी योग्य पद्धतीने देखभालीच्या कामाकडे लक्ष देत नाहीत. ठेकेदाराने कामचुकारपणा केला, तरी त्याला पाठीशी घालतात. याविषयी लोकप्रतिनिधींनीही नाराजी व्यक्त केली होती. एक महिन्यापूर्वी उद्यान विभागामध्ये ८ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आमदार मंदा म्हात्रे यांनी केल्यानंतर, आयुक्त अभिजीत बांगर यांनी चौकशीचे आदेश दिले व धक्कादायक गोष्टी समोर आल्या.
अतिरिक्त बिले मंजूर करुन घेतली
ठेकेदाराने सादर केलेल्या बिलांमध्ये प्रथमदर्शनी त्रुटी आढळून येत नव्हत्या. सर्व कामे केल्याचे दाखविण्यात आले होते. आयुक्तांनी दोन पथके तयार करून प्रत्यक्षात उद्यानांना भेटी दिल्यानंतर, कामे झालेली नसताना ती झाली असल्याचे सांगून अतिरिक्त बिले मंजूर करून घेतली असल्याचे समोर आहे. ठेकेदाराला कार्यादेश देताना व्यवस्थित काम न केल्यासदंड आकारण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दंड आकारण्याची स्पष्ट तरतूद
निविदेमधील अटी व शर्तीमध्येही कोणत्या कामासाठी किती दंड आकारला जाणार, याचा स्पष्ट उल्लेखही आहे. वेळेत उद्यान उघडले व बंद केले नाही, तर प्रतिदिन २ हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे. हिरवळीची देखभाल करणे, वृक्षांची देखभाल, संरक्षण भिंतीची देखभाल, जॉगिंग ट्रॅक ॲम्फिथिएटर व इतर गोष्टींच्या वेळेत देखभाल न केल्यास दंड आकारण्याची स्पष्ट तरतूद केली आहे. मात्र, मनपाच्या उद्यान विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ठेकेदाराकडून दंड वसूल केलाच नाही.
निष्काळजीपणासाठी दंडाची तरतूद
प्रकार दंड
वेळेवर उद्यान चालू व बंद न केल्यास २ हजार
स्वच्छता व कचरा व्यवस्थापन २ हजार
लॉन व वृक्षांना पाणी देणे २ हजार
लॉनची देखभाल ३ हजार
झुडपांची देखभाल ५ हजार
मोठ्या झाडांची देखभाल ७ हजार
मातीचा थर टाकणे २५ रुपये प्रती चौ.मी.
उद्यानातील साहित्याची देखभाल २ हजार
टॉय ट्रेन देखभाल २ हजार
शिल्प व इतर देखभाल २ हजार
रस्ते दुभाजकांमधील झुडपांची देखभाल २ हजार
खतनिर्मिती ५ हजार
राजहंस व बदकांची देखभाल २ हजार
संरक्षण भिंत दुरुस्ती १,५०० ते २ हजार
जॉगिंग ट्रॅक १,५००
सिंचन व्यवस्था १,५००
गजेबो ७ हजार
बैठक व्यवस्था १ हजार ते ७ हजार
ॲम्पिथिएटर ७ हजार
वॉटर फाउंटेन २ हजार
प्रसाधानगृह, पंपहाउस, वॉचमेन केबिन १ हजार ते ७ हजार
एंट्रन्स प्लाझा १ हजार
पार्किंग विभाग १ हजार
विद्युत व्यवस्था १,५००