मयूर तांबडेपनवेल : पनवेल शहरातील एकमेव असलेले वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते. कधी व्हीआयपी रूम नाकारण्यावरून, तर कधी सुरक्षारक्षकांच्या मनमानीवरून हे नाट्यगृह चर्चेत राहिले आहे. आता तर सुरक्षारक्षाकांकडून येणाºया प्रेक्षकांची कोणतीही तपासणी केली जात नसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे येथे येणाºया नाट्यकर्मी आणि इतर मान्यवरांच्या जीविताचा धोका निर्माण झाली आहे.करमणुकीचे दालन उपलब्ध करून देण्यासाठी क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाची निर्मिती करण्यात आली आहे. पनवेल येथील पालिकेने उभारलेल्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाचे उद्घाटन २ जून २०१४ रोजी करण्यात आले होते. पनवेल शहरात महापालिकेचे हे एकमेव नाट्यगृह आहे; पण ज्या उद्देशासाठी नाट्यगृहाची निर्मिती झाली तो उद्देश मात्र सफल होताना दिसत नाही; पण शहरातील नाटक परंपरा टिकवायची असेल व शहरवासीयांची सांस्कृतिक भूक पूर्ण करायची असेल, तर या नाट्यगृहात दर्जेदार नाटकांचे प्रयोग होणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात मात्र तसे होताना दिसत नाही. त्यामुळे नाट्यप्रेमींचा हिरमोड होताना दिसत आहे. सद्यस्थितीत पनवेलच्या फडके नाट्यगृहात इतर कार्यक्रमांचीच चलती असल्याचे दिसत आहे. जानेवारी २०१७ ते नोव्हेंबर २०१७ या ११ महिन्यांच्या काळात या नाट्यगृहात १५८ नाटके, तर तितकेच म्हणजेच १५८ इतर कार्यक्रम पार पडले आहेत. यात महापालिकेच्या १२ सर्वसाधारण सभेचा समावेश आहे. त्यामुळे नाट्यगृहात नाटकांपेक्षा इतर कार्यक्रमांचीच चलती असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. पनवेल नगरपरिषदेने सुमारे १९ कोटी रुपये खर्च करून हे नाट्यगृह उभारले आहे. पालिकेच्या सभा, सांस्कृतिक कार्यक्रम, जादूचे कार्यक्रम, संगीत कार्यक्र म, शालेय कार्यक्र म, आॅर्केस्ट्रा, प्रवचन, संगीत भजन, दिवाळी पहाट हेच कार्यक्र म जर नाट्यगृहात होणार असतील, तर नाट्यप्रेमींनी कुठे जायचे, असा सवाल प्रेक्षकांकडून उपस्थित केला जात आहे.
पनवेलच्या नाट्यगृहात नाटकांना नाही स्थान,सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य : प्रेक्षकांमध्ये नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 1:43 AM