पनवेल : पनवेल मधील आसुडगाव झोपडपट्टी याठिकाणी राहणाऱ्या परदेशी भगतगौड (24) या गरोदर महिलेला सोमवारी रात्री मध्यरात्री 1.30 च्या सुमारास प्रसूतीकळा सुरू झाल्या. यावेळी रुग्णालयात जाण्यासाठी वाहन नसल्याने या महिलेच्या नातेवाईकांनी 108 क्रमांकावर फोन केला. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने नातेवाईकांनी दुचाकीला हातगाडी बांधुन बाईक ऍम्ब्युलन्स तयार करून उपजिल्हा रुग्णालय गाठले.
पनवेल शहरासारख्या ठिकाणी गरोदर मातेला एम्बुलन्ससाठी ताटकळत रहावे लागले. मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने दुचाकीला हात गाडी बांधून ती दुचाकीला जोडून नातेवाईकांनी पनवेल उपजिल्हा रुग्णालय गाठले. या घटनेत ड्युटीवर असलेले 108 क्रमांकाच्या रुग्ण वाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी कामात चालढकल केल्याचे समोर आले आहे.सुमारे एक तासापेक्षा जास्त काळ या गरोदर मातेला वाहना अभावी मरणयातना सहन कराव्या लागल्या. सुदैवाने महिलेची प्रसूती सुखरूप झाली तिने गोंडस बाळाला जन्म दिला.मात्र या महिलेसाठी सोमवारची रात्र काळरात्र ठरली.शासनाचे आरोग्य विभाग वैद्यकीय सेवा प्रभावीपणे रुग्णांना देण्यासाठी विविध उपक्रम राबवित असतो.मात्र अशाप्रकारे काही बेजबाबदार कर्मचारी यामध्ये चालढकल करून दुसऱ्याचा जीव धोक्यात घालतात.
संबंधित महिला मूळची छत्तीसगढ मधील रहिवासी आहे.जुलै महिन्यात हि महिला पनवेल मध्ये आली.त्यानंतर या महिलेची स्थानिक आशा सेविकांमार्फत नियमित तपासणी केली जात होती.
पनवेल मधील स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून या घटनेच्या संबंधित अहवाल माझ्याकडे आल्यावर या घटनेतील दोषींवर कारवाई करण्यात येईल.-डॉ अंबादास देवमाने (जिल्हा शल्य चिकित्सक,रायगड )