‘नो सर्व्हिस नो व्होट’ मोहीम केवळ सोशल मीडियावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 12:12 AM2019-10-20T00:12:06+5:302019-10-20T06:02:53+5:30
बहिष्कार टाकण्यासंदर्भात तक्रार नाही
- वैभव गायकर
पनवेल : पनवेल मतदारसंघात मतदारसंघात पाच लाख ५७ हजार मतदार संख्या आहे. मात्र, मूलभूत सुविधा मिळत नसल्याने खारघर, कामोठे, कळंबोली आदी क्षेत्रातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू केली आहे. सोशल मीडिया, माध्यमे यांच्यावर ही मोहीम गाजत आहे. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यासदंर्भात एकही लेखी तक्रार प्राप्त झाली नसल्याने ही मोहीम केवळ सोशल मीडियावर सुरू आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पनवेल विधानसभा मतदारसंघातील खारघर, कामोठे, कळंबोली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासत आहे. विशेषत: खराब रस्त्यांचे कारण दाखवत अनेक रहिवासी सोसायट्यांनी आपल्या संकुलात ‘नो सर्व्हिस नो व्होट’ अशा आशयाचे बॅनर्स लावत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात गुरुवारी निवडणूक निर्णय अधिकारी दत्तू नवले यांनी प्रांत कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते.मतदानावर बहिष्कार टाकणाºया मतदारांचे मन वळविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, मोहिमेतील एकही मतदार बैठकीला फिरकला नाही. आम्हाला बैठकीचे निमंत्रण मिळाले नसल्याचे मोहिमेतील मतदारांचे म्हणणे होते.
एकीकडे निवडणूक आयोगामार्फ त मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असताना काही गृहसंकुलांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या घेतलेल्या निर्णयाने निवडणूक निर्णय अधिकारी कामाला लागले. त्यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालकांना पत्र लिहून सिडको नोडमधील समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. बहिष्कार टाकणाºया मतदारांचे मन वळविण्याच्या दृष्टीने शनिवारी पालिकेत उपयुक्त जमीर लेंगरेकर यांनी बैठक घेतली. या वेळी मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याची विनंती त्यांनी मतदारांना केली.
मतदानावर बहिष्कार टाकण्यासंदर्भात एकही लेखी तक्रार आमच्या कार्यालयाला प्राप्त झाली नाही. सोशल मीडिया व माध्यमांच्या मार्फत आम्हाला बहिष्काराची माहिती मिळाली आहे. त्याची दखल घेत आम्ही सिडकोला पत्र लिहिले असून, नागरिकांच्या समस्या दूर करण्याची विनंती पनवेलचे निवडणूक निर्णय अधिकारी दत्तू नवले यांनी केली आहे.