सीबीएसई शाळा पडली ओस, तीन दिवस एकही विद्यार्थी शाळेत नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 03:17 PM2023-06-24T15:17:55+5:302023-06-24T15:18:17+5:30
एकाही वरिष्ठांकडून ना भेट, ना चौकशी; नवी मुंबई महापालिकेने नेमले मराठी शिक्षक
नवी मुंबई : शिक्षक द्या अशी मागणी करून नवी मुंबई महापालिकेच्या कोपखैरणे सीबीएसई शाळेतील पालकांनी गुरुवारी ठिय्या आंदोलन करून शिक्षक द्या, तरच मुलांना शाळेत पाठवू, अशी भूमिका घेतली होती. त्यानुसार गेले तीन दिवस एकाही पालकाने मुलाला शाळेत पाठवले नाही. त्यामुळे शाळा भरू शकली नाही. असे असतानाही शिक्षण मंडळातील एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याने ना शाळेला भेट दिली ना चौकशी केली. त्यामुळे पालक संतापले आहेत.
महापालिकेला जर सीबीएसई शाळा चालवण्याची ऐपत नव्हती तर आमच्या मुलांच्या भवितव्याशी का खेळत आहात असा सवाल त्यांनी केला आहे. आमच्या मुलांना इतर शाळांत प्रवेश घेऊन द्या नाहीतर ही महापालिकेची शाळा खासगी संस्थेला चालवायला द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुख्यालयात शाळा भरवण्यावर पालक ठाम
पालकांनी सोमवारी पालिका मुख्यालयात शाळा भरविण्याचा निर्णय घेतला असून त्यावर ते ठाम आहेत. शनिवारपासून पाऊस सुरू झाला आहे. मोठ्या पावसाची शक्यता आहे. असे असताना पालक मुलांच्या भवितव्यासाठी मागे हटायला तयार नाहीत. पावसात आमच्या मुलांना जर काही झाले तर त्याची जबाबदारी महापालिकेची असेल असेही पालकांनी सांगितले.
ते शिक्षक म्हणतात, आम्हाला अभ्यास करावा लागेल
महापालिकेने बुधवारी सहा शिक्षकांची तात्पुरती ऑर्डर काढली. यातील पाच शिक्षक हजर झाले आहेत, पण ते सर्व मराठी माध्यमाचे आहेत. त्यांच्याशी संपर्क केला असता, आदेश असल्यामुळे हजर होणे क्रमप्राप्त होते. आम्हाला सीबीएसई अभ्यासक्रमाचा अभ्यास करावा लागेल. नंतर मुलांना शिकवू. यावरून शाळांची किती गंभीर परिस्थिती आहे हे लक्षात येते.
आंदोलनाचा श्री गणेशा होणार की?
आमदार गणेश नाईक यांच्याबरोबर रविवारी दुपारी काही पालक प्रतिनिधींची बैठक आयोजित केली आहे. ते काय भूमिका घेतात, त्याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. काही पालकांनी या बैठकीनंतर सोमवारच्या आंदोलनाचा श्री गणेशा होणार की नाही? याबाबत शंका उपस्थित केली आहे.
नेमकी शिक्षक भरती रखडली का?
महापालिकेचा सर्वच शाळेत शिक्षक कमी आहेत. गेली दीड दोन वर्षे पालिका प्रशासन शिक्षक भरतीसाठी अनेकदा निविदा प्रक्रिया राबवली आहे. मात्र, प्रतिसाद मिळत नाही असे सांगितले जात आहे. परंतु, ही शिक्षक भरती नेमकी रखडली कशांमुळे याबाबत आता शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.