नवी मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार गणेश नाईक यांनी २०२५ पर्यंत नवी मुंबईत मालमत्ता व पाणीपट्टी दरात वाढ केली जाणार नसल्याची घोषणा केली आहे. निवडणुकीमध्ये सत्ता गमवावी लागण्याची भीती असल्याने नाईक अशाप्रकारच्या घोषणा करत असल्याची टीका शिवसेना, काँगे्रस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे.महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली असल्यामुळे नवी मुंबईमध्ये लोकप्रिय घोषणांचा पाऊस पडू लागला आहे. यापूर्वी मालमत्ता करामध्ये सूट देणे, वाहनतळ नि:शुल्क करणे व कंत्राटी कामगारांना कायम सेवेत घेण्याचे अशासकीय ठराव मंजूर करण्यात आले आहेत. यानंतर आता भाजपनेते व माजी मंत्री गणेश नाईक यांनी शहरात २०२५ पर्यंत मालमत्ता व पाणीपट्टी दरामध्ये कोणतीही वाढ केली जाणार नसल्याची घोषणा केली आहे.महापालिकेच्या स्थापनेपासून गणेश नाईक यांची पालिकेवर सत्ता आहे. यापूर्वीही २० वर्षे कोणतीही करवाढ केली जाणार नसल्याची घोषणा करण्यात आली होती. यानंतर पुन्हा पुढील पाच वर्षांसाठीची घोषणा करण्यात आली आहे. श्हराची प्रगती करताना नागरिकांवर करवाढीचा कोणताही बोजा टाकण्यात येऊ नये, यासाठी ही घोषणा केली केली आहे. पर्यायी मार्गातून पालिकेचे उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. महापालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम असून २५०० कोटी रुपयांच्या ठेवी ठेवण्यात आल्या आहेत. क्रीसिल या संस्थेकडून नवी मुंबई महापालिकेला डबल ए प्लस स्टेबल पथमानांकन देण्यात आले आहे. यामुळे पुढील पाच वर्षे करवाढ होणार नसल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले आहे.भाजपच्या करवाढ न करण्याच्या घोषणेचे तत्काळ राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना, काँगे्रस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपकडून नागरिकांची दिशाभूल सुरू असल्याची टीका केली आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सत्ता जाण्याची भीती वाटत असल्यामुळेच अशाप्रकारे घोषणाबाजी सुरू असून नागरिक या भूलथापांना बळी पडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे येणाऱ्या काळात करवाढीचा मुद्दा निवडणुकीपूर्वी व निवडणुकीदरम्यान गाजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.करवाढ न करता विकासकामेयापूर्वी २० वर्षे करवाढ न करण्याचे आश्वासन पाळले असल्याचे माजी मंत्री गणेश नाईक यांच्या वतीने स्पष्ट केले आहे. यापुढेही पाच वर्षे करवाढ करणार नाही. करवाढ न करता विकासकामे करता येतात व उत्पन्न वाढविता येते, हे यापूर्वीही सिद्ध केले असल्याचे स्पष्ट केले आहे.महापालिका निवडणुकीमध्ये सत्ता जाण्याची भीती भाजपला व माजी मंत्री गणेश नाईक यांना वाटू लागली आहे. यामुळे पुढील पाच वर्षे करवाढ केली जाणार नाही, अशा प्रकारच्या घोषणा केल्या जात आहेत; परंतु नवी मुंबईतील जनता आता या भूलथापांना बळी पडणार नाही.- विजय नाहटा,उपनेते, शिवसेनामहापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करवाढ न करण्याची घोषणा केली आहे. वास्तविक महाविकास आघाडीमुळे भाजपला सत्ता गमावण्याची भीती वाटत आहे. त्यांच्याकडील अनेक नगरसेवक राष्ट्रवादी व शिवसेना व काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. स्वत:वर विश्वास नसल्याने अशाप्रकारची घोषणाबाजी सुरू आहे.- अशोक गावडे,जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँगे्रसनवी मुंबई महानगरपालिकेचे कराचे दर अगोदरच जास्त आहेत. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण असून, आम्ही कराचे दर कमी करून जनतेला दिलासा देणार आहोत. भाजपच्या निवडणुकीसाठीच्या घोषणाबाजीला आता जनता बळी पडणार नाही.- अनिल कौशिक,जिल्हाध्यक्ष, काँगे्रस
नवी मुंबईत पाच वर्षे करवाढ होणार नाही, गणेश नाईकांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 2:47 AM