नवी मुंबई : प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणावेळी ध्वजाच्या चौथऱ्यावर बूट घालून उभे राहिल्यामुळे पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात सोशल मीडियावर नाराजी व्यक्त होत आहे. त्यानुसार काहींनी मुंढे यांच्यावर कारवाईची मागणी करत मुख्यमंत्र्यांसह पोलीस आयुक्तांकडे तक्रार देखील केली आहे.गुरुवारी ध्वजारोहणादरम्यान सीबीडी येथील पालिका मुख्यालयात हा प्रकार घडला आहे. त्याठिकाणी महापौरांच्या हस्ते ध्वजारोहण करताना सोबत असलेले आयुक्त मुंढे हे ध्वजाच्या चौथऱ्याबर बूट घालून उभे होते. हे छायाचित्र सोशल मीडियावर पसरल्यानंतर आयुक्तांविरोधात नाराजी व्यक्त होवू लागली आहे. परंतु ध्वजारोहण करताना बुटासंदर्भात नियम नसल्याचे प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी सांगितले. तर यापूर्वी अनेक मंत्र्यांकडून देखील बूट घालून ध्वजारोहण झालेले आहे. त्यामुळे आयुक्तांकडून नियमाचे उल्लंघन झालेले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र मुंढे यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ऐरोली अध्यक्ष राहुल शिंदे यांनी केला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री व पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार करुन पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)
महापालिका आयुक्तांविरोधात नाराजीचा सूर
By admin | Published: January 28, 2017 3:07 AM