विभाग कार्यालयामुळे परीक्षा केंद्रात गोंगाट परीक्षार्थ्यांना व्यत्यय
By योगेश पिंगळे | Published: March 13, 2024 05:38 PM2024-03-13T17:38:24+5:302024-03-13T17:39:25+5:30
महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष.
योगेश पिंगळे, नवी मुंबई : महापालिकेच्या नेरूळ सेक्टर ४ येथील महापालिका शाळेच्या इमारतीच्या काही भागांत मागील काही वर्षांपासून महापालिकेचे विभाग कार्यालय सुरू आहे. सध्या दहावीच्या परीक्षा सुरू असून या शाळेतच परीक्षा केंद्र आहे. विभाग कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांसह विविध कामांसाठी नागरिकांची वर्दळ असते. यामुळे निर्माण होणाऱ्या गोंगाटामुळे परीक्षा केंद्रातील परीक्षार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
नवी मुंबई महापालिकेचे नेरूळ येथील विभाग कार्यालय मागील अनेक वर्षांपासून नेरूळमधील सिडको कार्यालय आणि शिरवणे येथील केंद्र इमारतीमध्ये सुरू होते. यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गैरसोय होत होती. हे टाळण्यासाठी मागील काही वर्षांपूर्वी नेरूळ सेक्टर ४ येथील महापालिकेच्या शाळेच्या इमारतीमध्ये विभाग कार्यालय स्थलांतरित केले आहे. या इमारतीच्या तळ आणि दुसऱ्या मजल्यावर विभाग कार्यालयाचे विविध विभाग सुरू असून, पहिल्या मजल्यावर शाळा आहे. शाळा आणि विभाग कार्यालय यांचे प्रवेशद्वार एकच असून, कामानिमित्त विभाग कार्यालयात ये-जा करणारे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते.
सध्या दहावीच्या परीक्षा सुरू असून या शाळेत परीक्षा केंद्र आहे. या इमारतीमधील नागरिकांच्या वर्दळीमुळे गोंगाट पसरत असून परीक्षार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून, विभाग कार्यालयासाठी इमारतीच्या दुसऱ्या बाजूकडील जिन्याचा वापर करण्याची मागणी पालकांनी केली आहे.