प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल, सात समित्या बिनविरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 02:35 AM2019-05-10T02:35:22+5:302019-05-10T02:35:31+5:30
महापालिकेच्या ८ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी गुरुवारी अर्ज दाखल करण्यात आले. सात ठिकाणची निवड बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवी मुंबई : महापालिकेच्या ८ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी गुरुवारी अर्ज दाखल करण्यात आले. सात ठिकाणची निवड बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एच प्रभाग समितीसाठी राष्ट्रवादी व शिवसेनेच्या उमेदवाराने अर्ज दाखल केले असून शुक्रवारी सकाळी निवडणूक होणार आहे.
प्रभागामधील विकासकामामध्ये प्रभाग समित्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. गटार, पदपथ दुरुस्ती, विद्युत दिवे व इतर दुरुस्तीची कामे प्रभाग समितीच्या माध्यमातून करता येतात. प्रभाग समितीचा निधी कमी असला तरी त्या माध्यमातून विभागामधील नागरिकांना भेडसावणाऱ्या महत्त्वाच्या समस्या सोडविता येतात. यामुळे समित्यांच्या कामाला विशेष महत्त्व असते. याशिवाय पालिकेच्या सर्वसाधारण सभा व स्थायी समितीमध्ये प्रत्येक नगरसेवकाला प्रभागामधील समस्या मांडता येतात. सन २०१९ - २० या वर्षासाठी अध्यक्ष निवडीसाठी ९ मेपर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. शेवटच्या दिवसापर्यंत ८ समित्यांसाठी एकूण ९ अर्ज दाखल झाले आहेत.
अ ते जी प्रभाग समितीसाठी एकच अर्ज आल्याने त्यांची निवडणूक बिनविरोध होणार आहे. राष्ट्रवादीने क प्रभाग समिती काँगे्रसला दिली असून ब प्रभाग समिती अपक्ष नगरसेविकेला उमेदवारी दिली आहे. आठपैकी ५ समित्यांसाठी राष्ट्रवादीने महिलांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी व काँगे्रस आघाडीचे सहा ठिकाणी बिनविरोध अध्यक्ष होणार आहेत. जी प्रभाग समितीवर शिवसेनेचे बिनविरोध अध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एच प्रभाग समितीसाठी राष्ट्रवादी काँगे्रसच्या दीपा गवते व शिवसेनेचे जगदीश गवते यांनी अर्ज भरला आहे. शुक्रवारी दुपारी ३ वाजता महापालिका मुख्यालयामधील राजमाता जिजाऊ सभागृहामध्ये अध्यक्षपदासाठीची निवड केली जाणार आहे.
प्रभाग समितीनिहाय उमेदवार पुढीलप्रमाणे
समिती उमेदवार
अ - बेलापूर स्वप्ना गावडे
ब - नेरूळ श्रद्धा गवस
क - वाशी अंजली वाळुंज
ड- तुर्भे उषा भोईर
इ- कोपरखैरणे लीलाधर नाईक
समिती उमेदवार
फ- घणसोली रंजना सोनवणे
जी - ऐरोली आकाश मढवी
एच-दिघा दीपा गवते
(राष्ट्रवादी),
जगदीश गवते (शिवसेना)