उत्तर भारतीय शिवसेनेसोबत- एकनाथ शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 11:34 PM2019-02-01T23:34:03+5:302019-02-01T23:34:30+5:30
निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आवाहन
नवी मुंबई : शिवसेनेने कधीही उत्तर भारतीय नागरिकांना त्रास दिला नाही. ठाण्यामध्ये एका पक्षाने उत्तर भारतीयांना त्रास दिला, त्यांच्या गाड्या फोडल्या, त्यांच्या व्यवसायाची दुकाने तोडली, त्या वेळेस शिवसेना उत्तर भारतीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. त्यामुळे उत्तर भारतीय समाज शिवसेनेच्या बाजूने उभा असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी शिंदे म्हणाले की ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे अनेक नगरसेवक उत्तर भारतीय आहेत. अयोध्येत उद्धव ठाकरे यांनी रामजन्मभूमीचे दर्शन घेतले. उत्तर भारतीयांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठ्या प्रमाणावर आकर्षण, आस्था आणि श्रद्धा आहे. कोणताही प्रसंग ओढवला तरी मदतीला सर्वात आधी धावून येणारा पक्ष शिवसेना असल्याचे सर्वांना माहीत आहे, त्यामुळे उत्तर भारतीय समाजाबरोबर सर्वच समाज शिवसेनेबरोबर येत असल्याचे शिंदे म्हणाले. शिवसेना जात, पात, धर्म मानणारा पक्ष नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे हे सर्वांना कळले असल्याने नवी मुंबईतील सर्व समाज शिवसेनेच्या बाजूने मुख्य प्रवाहामध्ये येत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेची पंढरपूर येथील उद्धव ठाकरे यांची विक्र मी सभा झाली. राज्यातील सर्वच घटकांना न्याय देण्याचे काम शिवसेना करत आहे. शिवसेना सत्तेत जरी असली, तरी जेव्हा जनतेचे प्रश्न येतात तेव्हा सत्ता, सरकार बाजूला ठेवून शिवसेना जनतेचे प्रश्न सोडविते. त्यामुळे शिवसेनेची नाळ सत्तेशी नाही तर जनतेशी जोडलेली असल्याचे त्यांनी सांगितले. नवी मुंबईतील दोन्ही विधानसभा मतदार संघासह ठाणे जिल्ह्यावरही निर्विवाद यश मिळविण्यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्न करावे असावे, असे आवाहनही त्यांनी केले.
निवडणुकीचे वर्ष आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी कंबर कसून कामाला लागले पाहिजे, असे मत शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी व्यक्त केले. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये हिंदी भाषकांनी सहकार्य केले असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या माध्यमातून शहरात आठवड्याला किमान २० कार्यक्र म घेण्यात येत असून, सुदैवाने आमच्यातील मतभेद मिटलेले असल्याचे त्यांनी सांगितले. वेळ वाया घालविण्यापेक्षा काम केले तर येणारा काळ आपलाच असल्याचे नाहटा यांनी सांगितले. या वेळी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, जिल्हाध्यक्ष द्वारकानाथ भोईर उपस्थित होते.