पनवेल : महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने आयोजित ‘राज्यस्तरीय शिवगान २०२१’ स्पर्धेत उत्तर रायगड जिल्ह्याने सांघिक स्पर्धेत ‘विजेतेपद किताब’ पटकाविला. तसेच प्राथमिक फेरीच्या उत्कृष्ट नियोजनाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही मिळवून उत्तर रायगड जिल्ह्याने महाराष्ट्रात अव्वल क्रमांकाची अभिमानास्पद कामगिरी केली आहे.
सामगंध कला केंद्र पनवेल यांनी सांघिक गटात सातारा येथे झालेल्या अंतिम फेरीत उत्तर रायगड जिल्ह्याचे नेतृत्व केले. या संघाने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार उदयनराजे भोसले, सांस्कृतिक सेलचे प्रदेश अध्यक्ष शैलेश गोजमगुंडे, प्रदेश प्रभारी लक्ष्मण सावजी आदी मान्यवरांच्या हस्ते १ लाख रुपये, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. यावेळी प्रदेश सदस्य सुनील सिन्हा, कोकण संयोजक राहुल वैद्य, सहसंयोजक दीपक पवार आदी उपस्थित होते. सांघिक प्रथम पारितोषिक सामगंध कला केंद्राच्या टीमने तर उत्कृष्ट नियोजनाचा पुरस्कार सांस्कृतिक सेलचे उत्तर रायगड जिल्हा संयोजक अभिषेक पटवर्धन, पनवेल सहसंयोजक गणेश जगताप, संजीव कुलकर्णी यांनी स्वीकारला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडा, पाळणा, शिवस्फूर्तिगीत, आरती, ओवी, ललकारी,अभंग आदी प्रकारच्या गीतांचा समावेश असलेल्या या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश भाजप सांस्कृतिक सेल प्रदेशाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी सातारा येथील झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सामगंध कला केंद्र पनवेलने सांघिक गटातून उत्तर रायगड जिल्ह्याचे नेतृत्व केले.