नारायण जाधव, उप-वृत्तसंपादक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात उद्घाटन केलेल्या सुरत येथील डायमंड बोर्सवरून विविध मते व्यक्त होत आहेत. राज्य सरकारने विविध उद्योग समूहांशी केलेले करारनामे पाहता देशातच नव्हे, तर संपूर्ण जगातील सुवर्णालंकारांसह हिरे-माणकांचे दागिने निर्मितीसह निर्यातीची राजधानी सुरत नव्हे, तर महामुंबईच राहणार आहे. नवी मुंबईत येत्या काळात महापे, जुईनगर आणि उलवे येथे जगातील सर्वांत मोठे जेम्स आणि ज्वेलरी पार्क आकारास येणार आहे. यातील महापे आणि जुईनगर येथील ज्वेलर्स पार्क बांधण्याची प्राथमिक प्रक्रिया सुरू झाली आहे.
नवी मुंबई शहर आता कालौघात आयटी कंपन्या आणि डेटा सेंटरचे हब होत चालले आहे. देशातील ७५ टक्के डेटा सेंटर नवी मुंबईत आकारास येत आहे. यातील काही कार्यान्वित झाले असून, लाखो हातांना यातून रोजगारही मिळाला आहे. शिवाय देशाच्या तिजोरीत परकीय गंगाजळी वाढविण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे.
खरे तर सुरतची डायमंड रिसर्च अँड मर्कंटाईल सिटी ३५.५४ एकरांत वसली असून, येथे ३०० चौरस फूट ते ७०० चौमी अर्थात ७,५०० चौरस फुटांची ४,२०० कार्यालये असलेले नऊ इंटरकनेक्टेड १५ मजली टॉवर्स असून, दीड लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यापेक्षा जास्त रोजगार महामुंबईत या क्षेत्रात होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
महापे एमआयडीसीत भूखंड क्रमांक ईएल २३७ वर पहिल्या टप्प्यात २१.३ एकरांवर पहिले पार्क आकार घेत आहे. तेथे एक लाख लोकांना रोजगार निर्माण होणार असून, रत्ने आणि आभूषणे बनविणारी १००० युनिट १४ माळ्यांच्या ९ इमारतीत असणार आहेत. एकूण ६० हजार कोटींची गुंतवणूक येथे अपेक्षित आहे.
जुईनगर येथील एकात्मिक गोल्ड क्राफ्ट पार्क पंचशील रिॲल्टी विकसित करणार आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने नुकतीच त्यास संमती दिली आहे. दोन हजार कोटींची प्राथमिक गुंतवणूक असलेल्या पार्कमध्ये १३ हजार लोकांना कायमस्वरूपी रोजगार मिळणार आहे. येथे १० माळ्यांच्या तीन इमारती असणार आहेत. महापे आणि जुईनगर दोन्ही ज्वेलरी पार्कमध्ये कामगारांच्या निवासस्थानांसह बँकांची कार्यालये, हॉलमार्किंग सेवा, सुरक्षित व्हॉल्ट सुविधा, रंगीत खडे आणि हिऱ्यांच्या चाचणीसाठी प्रयोगशाळाही असणार आहेत. दोन्ही पार्कची वैशिष्ट्ये म्हणजे सुरत येथे फक्त हिरे आणि सुवर्णालंकारांची निर्मिती होते; परंतु येथून निर्मितीसह निर्यातही होते. यामुळेच देशाच्या एकूण निर्यातीत महामुंबईचा वाटा ९० टक्क्यांहून अधिक आहे.