नोटबंदीने विवाहांचा बॅण्डबाजा
By admin | Published: November 18, 2016 02:11 AM2016-11-18T02:11:38+5:302016-11-18T02:11:38+5:30
सर्वत्र नोटाबंदीची धूम चालू असून बँकासमोर गेल्या काही दिवसांपासून जुन्या नोटा जमा करणे, नवीन नोटा घेणे, याकरीता गर्दीचा महापूर लोटला आहे.
विक्रमगड : सर्वत्र नोटाबंदीची धूम चालू असून बँकासमोर गेल्या काही दिवसांपासून जुन्या नोटा जमा करणे, नवीन नोटा घेणे, याकरीता गर्दीचा महापूर लोटला आहे. शहरीभागापेक्षा ग्रामीण भागामध्ये याचा मोठा परिणाम झालेला दिसत आहे़ लोक शेतावरील कामे सोडून दिवसभर उपाशीतापाशी बँकासमोर रांगेत उभे राहून संध्याकाळीच घरी जात आहेत. त्यामध्ये महिला, आबाल वृध्द, मजूर, शेतकरी, व्यापारी अशा सा-यांचा समावेश आहे़ मात्र याचा परिणाम आता लग्न सराईच्या मुहूर्तावर होत आहे.
तुळशीचे लग्न झाल्याबरोबर शहरीभागासह ग्रामीण भागामध्येही मुहूर्तावर लग्नाचा बार उडवला जातो़ यंदा २१ मुहूर्त आहेत़ त्यामुळे शहरीभागासह ग्रामीणभागामध्येही शेकडो लग्न मुहूर्तावर लागाणार आहेत़ मात्र ५०० व १००० रुपयांच्या नोटबंदीमुळे वधू-वरांसह कुंटुंबीयाची तारांबळ उडाली आहे़ खर्चासाठी जमविलेली पुंंजी नाईलाजाने पुन्हा बॅकेत जमा करावी लागत आहे़ दुकानदार व व्यापाऱ्यांनी जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याने समस्येत आणखीनच भर पडली आहे़ लग्नखर्चासाठी पैशांची जुळवाजुळव करतांना सगळ्यांच्या नाकी नउ येत आहे़ सोनेखरेदीत या निर्णयामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत़ ५०० ते १००० रुपयांच्या नोटा चलनातून रदद झाल्याने सराफही त्या घेण्यास तयार नाहीत़
लग्नसराईची खरेदी करायची की अनेक वर्ष जमा केलेली पुंंजी बॅकेत जमा करायची, असा संतप्त सवाल अनेक वधू-वरांच्या कुटुंबियाकडून विचारला जात आहे़ लग्न सराईमध्ये केटरर्स, बॅडवाले, मंडप डेकोरेटर्स, फोटोग्राफर, आदी सर्वजण अॅडव्हान्स म्हणून ५००, १००० च्या नोटा स्वीकारत नाहीत़ या सर्वासाठी सुटे पैसे आणायचे कुठून अशी समस्या आहे. (वार्ताहर)