नवी मुंबई : नियमित फायर ऑडिट न करता, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या १५० शाळांना पालिकेच्या शिक्षण विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. यासंदर्भात मनसेने शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार अग्निसुरक्षेकडे दुर्लक्ष करणाºया शाळांवर कडक कारवाईची मागणी होत आहे.शाळांमध्ये आगीसारखी दुर्घटना टाळण्यासाठी शाळांना नियमित फायर आॅडिटची सक्ती करण्यात आलेली आहे. यानुसार शाळांमध्ये अग्निशामक यंत्र बसवणे आवश्यक असून, त्याची वर्षातून दोनदा तपासणी करणे बंधनकारक आहे. यानंतरही नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील अनेक शाळांकडून अग्निसुरक्षेची बाब दुर्लक्षित करून विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात घातली जात होती. यामुळे भविष्यात अशा शाळांमध्ये आगीची दुर्घटना घडल्यास मोठ्या हानीची शक्यता उद्भवत होती. त्यानंतरही प्रशासनाकडूनही अशा शाळांवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात येत नव्हती. यामुळे मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी शिक्षण विभागाकडे अशा शाळांवर कारवाईची मागणी केली होती, त्यानुसार शिक्षण विभागाने १५० शाळांना नोटीस बजावली आहे. त्यांच्याकडून अग्निसुरक्षेत हलगर्जीपणा होत असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये अनेक नामांकित शाळांचाही समावेश आहे. या शाळांवर प्रशासनाकडून कारवाई करण्याची मागणी उपशहराध्यक्ष संदेश डोंगरे यांनी केली आहे.>शाळांमध्ये अग्निशामक यंत्र बसवणे आवश्यक असून, त्याची वर्षातून दोनदा तपासणी करणे बंधनकारक आहे.
शिक्षण विभागाकडून १५० शाळांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2020 12:05 AM