धोकादायक वसाहतींना प्रशासनाची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 12:54 AM2019-08-06T00:54:52+5:302019-08-06T00:54:55+5:30
घरांचा वापर थांबविण्याच्या सूचना; एमआयडीसीसह पालिकेकडून उपाय
नवी मुंबई : औद्योगिक वसाहतीमधील डोंगर उतारावर वसलेल्या झोपडपट्टी परिसरात एमआयडीसीसह पालिकेने अपघाताची माहिती देणारे फलक लावले आहेत. धोकादायक घरांमध्ये वास्तव्य करू नये असे आवाहन करण्यात आले असून दुर्घटना टाळण्यासाठी ही उपाययोजना केली आहे.
मुसळधार पावसामुळे शनिवारी गणपतीपाडा परिसरातील एक घर शनिवारी पडले.याशिवाय वाशीमधील वापरात नसलेली धोकादायक इमारतही कोसळली. यामुळे शहरातील इतर धोकादायक इमारती व औद्योगिक वसाहतीमध्ये डोंगर उतारावर वसलेल्या झोपड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. एमआयडीसीसह महापालिका प्रशासनाने सर्व धोकादायक वसाहतींच्या परिसरामध्ये अपघात होण्याची शक्यता असून येथील घरांचा वापर तत्काळ थांबविण्यात यावा अशी नोटीस दिली आहे. गणपतीपाडा मधील जवळपास ९ घरांना टाळे लावले आहेत. येथील नागरिकांना इतरत्र रहावे लागत आहे.
महापालिका प्रशासनाने सुरक्षेसाठी फलक लावले असले तरी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. घरे खाली करण्यास भाग पाडले जाईल अशी भिती व्यक्त केली आहे. प्रशासनाच्यावतीने मात्र सुरक्षेसाठी या उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती दिली.
अतीधोकादायक इमारती व डोंगर उतारावरील घरांना व वसाहतीच्या परिसरामध्ये धोक्याची पुर्वसुचना देणारे फलक व नोटीस लावण्यात आली आहे. दुर्घटना होवू नये यासाठी नागरिकांनी धोकादायक इमारतींचा वापर तत्काळ थांबवावा असे आवाहनही केले आहे.
- दादासाहेब चाबुकस्वार उपायुक्त परिमंडळ -१