तलाठी कार्यालय हटविण्याच्या नोटिसा

By admin | Published: January 26, 2017 03:34 AM2017-01-26T03:34:37+5:302017-01-26T03:34:37+5:30

पनवेल तहसीलदार कार्यालयात गेली कित्येक वर्षे ठाण मांडून बसलेल्या तलाठी व मंडळ अधिकारी यांना तहसीलमधून कार्यालये हलवण्याच्या

Notice of deletion of Talathi office | तलाठी कार्यालय हटविण्याच्या नोटिसा

तलाठी कार्यालय हटविण्याच्या नोटिसा

Next

मयूर तांबडे / पनवेल
पनवेल तहसीलदार कार्यालयात गेली कित्येक वर्षे ठाण मांडून बसलेल्या तलाठी व मंडळ अधिकारी यांना तहसीलमधून कार्यालये हलवण्याच्या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना आपला बोजा बिस्तरा गुंडाळावा लागणार आहे. पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे यांनी तशा नोटिसा तलाठी व मंडळ अधिकारी यांना दिल्या आहेत. त्यामुळे तहसील कार्यालयात चिकटून बसलेल्या तलाठ्यांना आपापल्या सजामध्ये जावे लागणार आहे.
पनवेल तालुका हा लोकसंख्येच्या तुलनेत मोठा तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे नागरिकांची तलाठ्यांकडे नेहमीच कामे असतात. सातबारा तसेच त्याच्याशी निगडित अन्य कामे तलाठी तसेच मंडळ अधिकारी याच्यामार्फत होत असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून तलाठी व मंडळ अधिकारी सजेच्या ठिकाणी न बसता तहसील कार्यालयात बसत आहेत. त्यामुळे आपल्या दूरच्या गावावरून नागरिकांना पनवेलला यावे लागत आहे. गावातील सजा सोडून पनवेलला यावे लागत असल्याने नागरिकांचा वेळ व पैसा दोन्ही खर्च होतात. पनवेलमध्ये सद्यस्थितीत ६९ ग्रामपंचायती असून १७७ गावे व वाड्या आहेत. तसेच ३५ तलाठी सजा व ५ मंडळ अधिकारी आहेत. पनवेलमधील ग्रामीण नागरिकांना सातबारा, फेरफार, अर्जाची चौकशी, उत्पन्नाच्या दाखल्याची चौकशी, जातीचे दाखले, नॉन क्रिमिलिअर दाखले, शेतकरी दाखले इत्यादि कामांसाठी आपल्या गावापासून पनवेलपर्यंतची दूरवरची पायपीट करावी लागत आहे. तसेच काही वेळेला तलाठी न भेटल्यामुळे पुन्हा फेऱ्या माराव्या लागतात. महसूल प्रशासन आणि जनतेचा दुवा म्हणून तलाठ्यांकडे पाहिले जाते. गावपातळीवर लोकांच्या अडीअडचणीत उपयोगी पडणारे अनेक गावचे तलाठी भाऊसाहेब तहसीलदार कार्यालयात बसूनच काम पाहत होते. त्यामुळे पनवेल तहसील कार्यालयातून तलाठी व मंडळ अधिकारी यांना पनवेल तहसीलमधून कार्यालये हलवून सजेच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यास सांगितले आहे. नागरिकांचे प्रश्न व अडीअडचणी लक्षात घेऊन तहसीलदारांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
पनवेलची व्याप्ती मोठी आहे. अनेक गावे पनवेल शहरापासून लांब आहेत. त्यातच तलाठी आपल्या सजेचे ठिकाण सोडून पनवेल तहसील कार्यालयात बसत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने निर्णय घेतला.

Web Title: Notice of deletion of Talathi office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.