कळंबोली : कोरोनाच्या काळात शाळा सुरूकरण्यास तसेच विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्यास शासनाकडून मज्जाव करण्यात आला आहे. तरीदेखील शासनाच्या आदेशाला बगल देत ३ जुलै रोजी कोळखे येथील बेथनी कॉन्व्हेंट शाळेने १ली ते ७वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून परीक्षा घेतली. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत शिक्षण विभागाकडून परीक्षा घेतल्याबाबत दोन दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत.कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यात पनवेल परिसर रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात १० दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. या काळात शाळेकडून निष्काळजीपणा दाखविला जात आहे. कोळखे येथील बेथनी कॉन्व्हेंट शाळेने ३ जुलै रोजी विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून परीक्षा घेतली. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध करताच या बातमीची दखल घेत शिक्षण विभागाकडून तातडीने गट शिक्षण अधिकारी नवनाथ साबळे यांनी खुलासा सादर करण्याचे निर्देश मुख्याध्यापकांना दिले आहे. आपल्या शाळेकडून शासकीय नियमाचा भंग केला आहे, असे त्यात म्हटले आहे.
परीक्षा घेतल्याने शाळेला शिक्षण विभागांची नोटीस, दोन दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 12:51 AM