नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर रुग्नांना सेवा न देणाऱ्या रुग्णालयांवर महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत पाच रुग्णालयांना मेस्मा अंतर्गत नोटीस देण्यात आली असून वेळ पडल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे.महानगरपालिका आयुक्तांनी वाशीमधील विजया नर्सिंग होम, कोपरखैरणेमधील डॉ. देठे हॉस्पिटल, सीबीडीमधील सुखदा हॉस्पिटल व ऐरोलीमधील जस्मीन हॉस्पिटल यांना मेस्मा अंतर्गत नोटीस दिली आहे. रुग्णालय सुरू ठेवण्यात आले नाही, तर बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट १९४९ नुसार रुग्णालयाची नोंदणी रद्द करण्याचा इशारा दिला आहे. महानगरपालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केल्यामुळे दोन महिन्यांपासून दवाखाने बंद करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये जवळपास २१६ रुग्णालये, ४०५ आयुर्वेदिक क्लिनिक, २७२ होमिओपॅथी क्लिनिक, १०० आहारतज्ज्ञ, ८१ स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यापासून अनेकांनी रुग्णालये बंद केली आहेत. यामुळे कोरोनाव्यतिरिक्त आजार झालेल्या रुग्णांची गैरसोय होऊ लागली आहे. खाजगी रुग्णालये सेवा देत नसल्याने सर्व ताण महानगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रांवर पडू लागला आहे. साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम १८९७ नुसार व महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा कायदा २०११ कलम २ प्रमाणे सर्व रुग्णालये व दवाखाने सुरू ठेवणे आवश्यक आहे.