डायलिसिस सुविधा नाकारणाऱ्या रुग्णालयांना नोटीस; महापालिकेचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 12:40 AM2020-05-24T00:40:39+5:302020-05-24T06:32:42+5:30
सानपाडा सेक्टर ५ मधील १५ वर्षीय मुलगा गेल्या एका वर्षापासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होता.
नवी मुंबई : सानपाडा सेक्टर ५ येथील मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त १५ वर्षीय मुलाला खासगी रुग्णालयाने डायलिसिस सुविधा न दिल्याने उपचाराअभावी त्याचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. नवी मुंबई महापालिका प्रशासनाने डायलिसिस सुविधा नाकारणाºया रुग्णालयांना नोटीस बजावली असून खुलासा देण्याचे आदेश दिले आहेत. खुलासा न दिल्यास नोंदणी रद्द करण्याचे संकेत दिले आहेत.
सानपाडा सेक्टर ५ मधील १५ वर्षीय मुलगा गेल्या एका वर्षापासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होता. त्याच्यावर डायलिसिसचे उपचार सुरू होते. एका खासगी रुग्णालयात डायलिसिसचे उपचार घेताना त्याला कोरोनाची लागण झाली होती. महापालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात डायलिसिसची सुविधा बंद असल्याने मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अवघ्या दहा दिवसांत कोरोनावर मात करून मुलगा घरी परतला होता. त्यानंतर दोन दिवसांत डायलिसिसची गरज होती.
मुलाच्या पालकांनी शहरातील अनेक रुग्णालयांना डायलिसिससाठी विनंती केली; परंतु डायलिसिस उपचार करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने नकार दिला. अखेरीस उपचार न मिळाल्याने मुलाचा मृत्यू झाला. याबाबत ‘लोकमत’ने बातमी प्रसिद्ध केली होती. या घटनेची दखल घेत शहरातील लोकप्रतिनिधींनी संबंधित दोषींवर कारवाईची मागणी महापालिका प्रशासनाकडे केली. त्यानुसार उपचारासाठी नकार देणाºया रुग्णालयांना महापालिकेने नोटीस पाठवून खुलासा मागितला आहे.
पालिका अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
शहरात महापालिकेचे एकमेव सार्वजनिक रुग्णालय आहे. कोरोनाबाधित रुग्णांना उपचार देण्यासाठी रुग्णालयाचे कोविड रुग्णालयात रूपांतर करण्यात आले आहे; परंतु पालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी इतर आजराच्या रुग्णांना देण्यात येणाºया सुविधांची अन्य ठिकाणी व्यवस्था का केली नाही, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत असून संबंधित अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.