मृत विद्यार्थिनीच्या पालकांना फीची नोटीस; उरणमधील शाळा व्यवस्थापनाचा प्रताप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 07:29 AM2023-02-27T07:29:30+5:302023-02-27T07:29:43+5:30
उरण तालुक्यातील नामांकित उरण एज्युकेशन सोसायटीची यूईएस इंग्रजी माध्यमाची बारावीपर्यंत शाळा आहे.
- मधुकर ठाकूर
लोकमत न्यूज नेटवर्क
उरण : नोव्हेंबर महिन्यात आकस्मिक निधन झाल्यानंतर शाळेच्या रजिस्टरमधून नाव कमी करण्यात आल्यानंतरही येथील यूईएस शाळेने संबंधित पालकाला त्वरित फी भरण्यासाठी नोटीस बजावल्याचा प्रकार घडला आहे.
उरण तालुक्यातील नामांकित उरण एज्युकेशन सोसायटीची यूईएस इंग्रजी माध्यमाची बारावीपर्यंत शाळा आहे. या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हनुमान कोळीवाडा येथील रहिवासी भक्तेश म्हात्रे यांच्या आठ वर्षे वयाच्या दोन जुळ्या मुली दुसरीत शिकत होत्या. या दोन जुळ्या मुलींपैकी हर्षी हिचे १ नोव्हेंबर २०२२ रोजी आकस्मिक निधन झाले. मुलीच्या निधनानंतर पालकांनी वर्ग शिक्षक, शाळा व्यवस्थापनाची भेट घेऊन माहिती दिली. मृत्युचा दाखला सादर करून हर्षीचे नावही शाळेच्या रजिस्टरमधून नोव्हेंबर महिन्यातच कमी केले आहे. मात्र, चिमुकल्या हर्षीच्या आकस्मिक दुर्दैवी निधनातून पालक सावरलेले नसताना २४ फेब्रुवारीला शाळा व्यवस्थापनाने मृत हर्षीची नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत सहा हजार रुपये फी तत्काळ भरण्यासाठीची नोटीस बजावली आहे.
शाळा व्यवस्थापनाचा हा प्रकार मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखा आणि संतापजनक आहे. कोरोना काळातही शाळेने शासनाच्या आदेशानंतरही शाळा बंद असतानाही पालकांकडून सक्तीने फी वसूल केली. आता पुन्हा ३१ टक्के फी वाढीचा प्रस्ताव आणला आहे. विचारणा करणाऱ्यांना उलट उत्तरे दिली जात आहेत.
- प्राजक्ता गांगण, उपाध्यक्षा, पालक- शिक्षक संघ, यूईएस शाळा
शाळा व्यवस्थापनाची चूक झाली आहे. फी वसुलीसाठी नोटीस काढणाऱ्या शिक्षक, कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींच्या पालकांची भेट घेऊन माफीही मागितली आहे.
- तनसुख जैन, अध्यक्ष, यूईएस