नवी मुंबई : नेरूळ प्रभाग ८७ मधील समस्या पाहण्यासाठी आयुक्तांकडे पाठपुरावा करून ते वेळ देत नसल्याने नगरसेविका सुनिता रतन मांडवे यांनी सर्वसाधारण सभेत नाराजी व्यक्त केली. आयुक्त वेळ देत नसतील तर सभागृहात बसून निषेध करण्याचा इशारा त्यांनी दिली. महानगरपालिकेची निवडणूक झाल्यापासून शहरातील विकासकामे धीम्या गतीने सुरू आहेत. एलबीटी रद्द झाल्याने पालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाली असल्याने विकास कामांना कात्री लावण्यात आली आहे. प्रभाग समित्यांची नियुक्ती रखडल्यामुळे नगरसेवक व प्रभाग समिती निधीमधूनही कामे करता येत नाहीत. आयुक्तांच्या अधिकारामध्येच शक्य तेवढी कामे करावी लागत आहेत. प्रभाग ८७ मधील नगरसेविका सुनिता रतन मांडवे यांनी सहा महिन्यांपासून आयुक्तांना पत्र देवून व प्रत्यक्षात भेटून प्रभागामधील समस्या जाणून घेण्यासाठी दौरा आयोजित करण्याची विनंती केली होती. आयुक्तांनी दोन वेळा वेळ दिली, परंतु प्रत्यक्षात आयत्या वेळी दौरा रद्द करावा लागला. आयुक्तांना सहा महिन्यांत प्रभागाच्या दौऱ्यासाठी वेळ नसल्यामुळे संतप्त झालेल्या मांडवे यांनी सर्वसाधारण सभेमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली. दौरा करण्यासाठी येण्याचे लेखी आश्वासन दिले नाही तर सभागृहात जमिनीवर बसून निषेध व्यक्त करण्याचा इशारा दिला. या प्रकारामुळे सर्वच थक्क झाले होते. अखेर आयुक्त दिनेश वाघमारे यांनी लवकरच दौरा करण्याचे आश्वासन देवून समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)
नगरसेविकेचा सभागृहात आंदोलनाचा इशारा
By admin | Published: November 23, 2015 1:31 AM