कांदा-बटाटा मार्केट खाली करण्याची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 04:27 AM2018-06-13T04:27:54+5:302018-06-13T04:27:54+5:30

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा-बटाटा मार्केट अतिधोकादायक घोषित केले आहे. मार्केटचा वापर थांबवून ते तत्काळ खाली करण्याचे फलक पालिकेने लावले आहेत.

 Notice to reduce onion and potato market | कांदा-बटाटा मार्केट खाली करण्याची नोटीस

कांदा-बटाटा मार्केट खाली करण्याची नोटीस

Next

- नामदेव मोरे
नवी मुंबई  -  मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा-बटाटा मार्केट अतिधोकादायक घोषित केले आहे. मार्केटचा वापर थांबवून ते तत्काळ खाली करण्याचे फलक पालिकेने लावले आहेत. १५ वर्षांपासून व्यापारी, कामगार व ग्राहक जीव मुठीत धरून व्यवसाय करत आहेत. २५ हजार नागरिकांचा जीव धोक्यात असून, पुनर्बांधणीचा प्रश्न कधी मार्गी लागणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील ३७८ इमारती अतिधोकादायक घोषित करण्यात आल्या असून, त्यामध्ये कांदा-बटाटा मार्केटचाही समावेश आहे. राज्य शासनाने मुंबईमधील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी बाजार समितीची पाच मार्केट नवी मुंबईमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय ८०च्या दशकामध्ये घेतला. १९८१मध्ये सर्वप्रथम कांदा-बटाटा मार्केट स्थलांतर करण्यात आले. सिडकोने येथील पाचही मार्केटचे बांधकाम केले; पण बांधकामाचा दर्जा चांगला नसल्याने २० वर्षांमध्ये मार्केट धोकादायक बनले. पिलरला तडे गेले. धक्क्यांची दुरवस्था झाली. छताचे प्लास्टर कोसळू लागले. मार्केटसमोरील सज्जा कोसळू लागला. वारंवार छताचा भाग कोसळू लागल्यामुळे मार्केटचे संरचनात्मक परीक्षण करण्यात आले व अखेर २००३मध्ये महापालिकेने काही विंग धोकादायक घोषित केल्या. संचालक मंडळाने पुनर्बांधणीचा निर्णय घेतला; पण व्यापारी संघटना न्यायालयात गेल्यामुळे हा प्रश्न रखडला होता. अखेर २००५मध्ये न्यायालयाने एल आकारामध्ये मॉल उभारावा व उर्वरित जागेमध्ये व्यापाऱ्यांना मोफत मार्केट उभारून द्यावे, असे आदेश दिले होते; परंतु त्यानंतरही विविध अडथळ्यांमुळे मार्केटची पुनर्बांधणी रखडली असून, सद्यस्थितीमध्ये संचालक मंडळ नसल्याने न्यायालयाने धोरणात्मक निर्णय घेण्यास प्रशासकीय मंडळाला मनाई केली आहे.
महापालिकेने मार्केटचा वापर थांबविण्याची नोटीस बाजार समितीला व व्यापाºयांना दिली आहे. दोन्ही प्रवेशद्वारावर फलक लावले आहेत. यामुळे व्यापाºयांमध्येही संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे. मार्केट धोकादायक घोषित केल्यानंतर व्यापाºयांनी स्वखर्चाने गाळ्यांवर शेड टाकले आहे. माल ठेवायच्या जागेच्या वरील छत कोसळू नये, यासाठी लोखंडी खांबांचे टेकू देण्यात आले आहेत. आवश्यक तिथे प्लास्टरही केले आहे; परंतु संपूर्ण मार्केटचीच स्थिती बिकट झाली असून, टेकू लावायचे तरी कुठे व किती? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सर्वाधिक असुरक्षिततेची भावना माथाडी कामगारांमध्ये निर्माण झाली आहे. कामगारांचा वावर असलेल्या ठिकाणी छतामधील लोखंड दिसू लागले आहे. प्लास्टर वारंवार कोसळत आहे. अपघात होऊन जीवितहानी होण्यापूर्वी पुनर्बांधणीचा प्रश्न मार्गी लागावा, अशी अपेक्षा कामगारांनी व्यक्त केली.

कांदा-बटाटा मार्केटची पुनर्बांधणी करण्याचे विचाराधीन आहे; परंतु प्रशासकीय मंडळाला धोरणात्मक निर्णय घेण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. महापालिकेने अतिधोकादायक इमारतींमध्ये मार्केटचा समावेश केला असून, मार्केट खाली करण्याची नोटीस दिली आहे. ही बाब पुन्हा न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल.
- सतीश सोनी, मुख्य प्रशासक, बाजार समिती
कांदा-बटाटा
मार्केटचा तपशील
क्षेत्रफळ ७.९२ हेक्टर
एकूण गाळे २४३
गाळ्यांचे क्षेत्रफळ ६७ चौ.मी
लिलावगृह २५५० चौ.मी
मध्यवर्ती इमारत ३९९६ चौ.मी
रोजची वर्दळ २५ हजार

Web Title:  Notice to reduce onion and potato market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.