नवी मुंबई : नवी मुंबईमधील अतिरिक्त जिल्हा न्यायालयामध्ये महालोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिकेच्या मालमत्ताकर, उपकर व पाणीबिल थकविणाऱ्या ३५८५ जणांना नोटीस पाठविण्यात आली होती. या माध्यमातून ५ कोटी ५५ लाख रुपये मालमत्ता व उपकर आणि १ लाख ३३ हजार रुपये पाणीबिलाची वसूली झाली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ताकरांची थकबाकी असणाऱ्या ८३४ थकबाकीदारांना नोटीस पाठविले होते. त्यांच्याकडे ११ कोटी १२ लाख रुपये थकीत कर होता. यापैकी ९५ जणांनी १ कोटी ६५ लाख रुपये कराची भरणा केली आहे. स्थानिक संस्था कर व उपकराची थकबाकी असणाऱ्या ४६३ जणांना नोटीस दिली होती. त्यांच्यापैकी २९ जणांकडील ४ कोटी ३९ लाख रुपये कर वसूली झाली आहे. पाणी बिलाची थकबाकी असणारांना थकीत रक्कमेच्या २५ टक्के सवलत दिली होती. २२८८ जणांना नोटीस काढण्यात आल्या होत्या. यापैकी २०५३ जणांना प्रत्यक्षात नोटीस दिली होती. त्यांच्याकडून १ लाख ३३ हजार रुपये थकबाकी वसूल केली आहे.
लोकअदालतीमध्ये न्यायालयात दावा दाखल करण्यापूर्वीची प्रकरणे व प्रलंबीत दाव्यामध्ये तडजोडीमध्ये ठेवावयाची प्रकरणे चालविली जातात. अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने बजावलेल्या नोटीशीच्या अनुषंगाने थकबाकीदार कर भरण्यासाठी पुढे येवू लागले आहेत. मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई यांनीही यासाठी महत्वाची भुमीका बजावली.