उल्हासनगर : शहरात इमारत बांधकाम पूर्णत्वाचा दाखला अर्थात भोगवटा प्रमाणपत्र न घेणाऱ्यांवर पालिकेने बडगा उगारला आहे. अशा ४०० बांधकामांना नोटिसा देऊन पूर्णत्वाचा दाखला घेण्याचे बजावून एमआरटीपीचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा नगररचना विभागाने विकासकांना दिला आहे. गेल्या ३ वर्षांत पालिका नगररचना विभागाने ४०३ बांधकामांना बांधकाम परवानगी दिली आहे. त्यातील केवळ बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतलेली ३ प्रकरणे आहेत. इतर ४०० बांधकाम प्रकरणात दाखला घेतला नसल्याचे उघड झाले आहे. त्यातील बहुतांश जणांनी वाढीव बांधकामे केल्याचे चौकशीअंती उघड झाले असून, आयुक्तांच्या आदेशान्वये त्यांच्यावर कारवाई होणार आहे. बांधकाम परवाना घेतल्यानंतर पूर्णत्वाचा दाखला न घेतल्याचे प्रकार निदर्शनास येऊनही याविरोधात उल्हासनगर महापालिकेने अद्यापही कोणतीही ठोस कारवाई केली नव्हती. शहरात ९० टक्के इमारतींना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला नसतानाही पालिका वर्षानुवर्षे पाणीपुरवठ्यासह इतर सुविधा देत आहे. ज्या इमारतीने पूर्णत्वाचा दाखला घेतला नाही, अशा इमारतीला वीज, पाण्यासह इतर सुविधा देऊ नये, असा पालिका अधिनियम आहे. याला न जुमानता या इमारतींना सर्व सुखसुविधा पालिका देत आहे. तीन मजल्यांची परवानगी असताना बिल्डर स्वत:च्या हितासाठी ५ ते ६ मजली इमारत बांधूनही नगररचना विभागाने कारवाई केलेली नाही.
४०० इमारत बांधकामांना नोटिसा
By admin | Published: February 02, 2016 3:59 AM