पनवेलमधील बार चालकांना नोटिसा, एक बार सील : फायर परवानगी नसलेले बार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 02:36 AM2018-01-08T02:36:54+5:302018-01-08T02:37:18+5:30
मुंबईमधील कमला मिल कंपाउंडमधील मोजोस आणि वन अबव्ह पबला लागलेल्या आगीत १४ जणांना आपला जीव गमवावा लागला. अग्निशमन यंत्रणेच्या अभावामुळे ही घटना घडल्यानंतर संपूर्ण राज्यभर या घटनेचे पडसाद उमटले.
पनवेल : मुंबईमधील कमला मिल कंपाउंडमधील मोजोस आणि वन अबव्ह पबला लागलेल्या आगीत १४ जणांना आपला जीव गमवावा लागला. अग्निशमन यंत्रणेच्या अभावामुळे ही घटना घडल्यानंतर संपूर्ण राज्यभर या घटनेचे पडसाद उमटले. याच धर्तीवर पनवेल महानगर पालिका हद्दीतील बार, रेस्टॉरंट, तसेच हॉटेलच्या झाडाझडतीला पालिकेने सुरुवात केली आहे. या घटनेच्या अनुषंगाने शहरातील लेडीज बार बंद करण्यात आले असून, एका बारला सील ठोकण्यात आले आहे.
पालिका हद्दीतील रेस्टॉरंट, हॉटेलच्या सर्व्हेला सुरुवात केली आहे. अद्यापपर्यंत ४२ हॉटेल्सचा
सर्व्हे करून नोटिसा पाठवल्या आहेत. मंगळवारी सायंकाळी थेट आयुक्तांनी शहरात बारची तपासणी केली असता त्यांना फायर परवानगी न घेतलेले बार आढळून आले.
जगदंबा, चाणक्य, सनी, सनसिटी, महाराजा, आर्या, सप्तगिरी या बंद पाडण्यात आलेल्या लेडीज बारची नावे आहेत.
अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाºया फायर एनओसीसह महत्त्वाच्या परवानग्या नसल्यामुळे आयुक्त डॉ. शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात शुक्रवारी आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची पनवेलमधील बार मालकांनी भेट घेतली. महिनाभरात आम्ही सर्व परवानग्या घेतो तोपर्यंत आम्हाला बार सुरू करण्याची परवानगी द्या, मात्र आयुक्तांनी हा गंभीर विषय असून अशाप्रकारे
बार सुरू करता येणार नसल्याचे खडे बोल बार मालकांना सुनावले.