पनवेल परिसरातील सुकापूरमधील ५१ इमारती धोकादायक, ग्रामपंचायतीने पाठविल्या नोटिसा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 02:01 AM2019-08-14T02:01:56+5:302019-08-14T02:04:24+5:30
सुकापूर (पाली-देवद) येथील ५१ इमारती धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत.
- मयूर तांबडे
पनवेल : सुकापूर (पाली-देवद) येथील ५१ इमारती धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. या इमारती रिकाम्या करण्याच्या नोटिसा ग्रामपंचायतीने रहिवाशांना पाठविल्या आहेत. त्यामुळे रहिवाशांत एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीने या धोकादायक इमारतींची यादी सिडको प्रशासनालाही पाठविल्याचे समजते.
नवीन पनवेल शहरालाच सुकापूर गाव लागून असल्याने येथे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढू लागली आहे. मोठमोठे बांधकाम व्यावसायिक सुकापूर परिसरात आलेले आहेत. त्यामुळे नागरीकीकरण प्रचंड प्रमाणात वाढू लागले आहे. ३५ ते ४० वर्षांपूर्वी बांधलेल्या काही इमारती धोकादायक अवस्थेत आहेत. काही इमारती तर कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा इमारतींना ग्रामपंचायतने नोटिसा बजावून इमारती खाली करण्यास सांगितल्या आहेत. काही जण जीव मुठीत धरून आजही या धोकादायक इमारतीत वास्तव्य करत असल्याचे समोर आले आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १५ हजार इतकी नोंदविली आहे. गेल्या नऊ ते दहा वर्षांत परिसराचा विकास झपाट्याने झाला, त्यामुळे लोकवस्तीत लक्षणीय वाढ झाली आहे. सद्यस्थितीत येथील लोकसंख्या ४० हजारांच्या घरात आहे. ग्रामपंचायत हद्दीत शेकडोंच्या संख्येने गृहनिर्माण सोसायट्या आहेत. सध्या पावसाळा सुरू असल्याने धोकादायक इमारती पडून अपघात होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर सुकापूर ग्रामपंचायतीने धोकादायक इमारतीतील रहिवाशांना इमारती रिकाम्या करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यानुसार काही रहिवाशांनी इमारती रिकाम्या केल्या आहेत. तर काही जण अद्यापि वास्तव्य करून आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा इमारतीतील सर्व रहिवाशांनी तातडीने स्थलांतरित व्हावे, असे निर्देश ग्रामपंचायतीमार्फत जारी करण्यात आले आहेत. तसेच या गृहनिर्माण सोसायटीने सर्व सदस्यांसह इमारत खाली करून इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करून घेण्यास सांगितले आहे. ग्रामपंचायतीने शहर व औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) यांनाही धोकादायक इमारतींची यादी पाठवली आहे.
धोकादायक इमारतींची नावे : वृंदावन सोसायटी, वंदन सोसायटी, श्रीकृष्ण सोसायटी, साईधाम सोसायटी, वसंत सोसायटी, नीलाचल सोसायटी, मुरलीधर सोसायटी, साईगंगा सोसायटी, साई अमृत सोसायटी, साई समर्थ सोसायटी, वसुंधरा सोसायटी, न्यू सरस्वती सोसायटी, यमुना सोसायटी, न्यू कावेरी सोसायटी, अष्टविनायक सोसायटी, तपोवन सोसायटी, न्यू प्रेरणा सोसायटी, शांतिनिकेतन सोसायटी, साईसागर सोसायटी, ज्योती सोसायटी, सिद्धी सोसायटी, श्री सिद्धिविनायक सोसायटी, निर्मळ सोसायटी, प्रेरणा सोसायटी, चेतना सोसायटी, नवजीवन सोसायटी, स्नेहसागर सोसायटी, प्रभात सोसायटी, राधाकृष्ण सोसायटी, मातोश्री सोसायटी, साईश्रद्धा सोसायटी, सर्वोदय सोसायटी, सुयोग सोसायटी, गंगा सोसायटी, कृष्णा सोसायटी, गोदावरी सोसायटी, श्रीनिकेतन सोसायटी, सूर्या सोसायटी, साईकृपा सोसायटी, त्रिदेव सोसायटी, शिवसागर सोसायटी, स्वप्नपूर्ती सोसायटी, फिनिक्स सोसायटी, अवंतिका सोसायटी, स्नेहकुंज सोसायटी, श्रीगणेश सोसायटी, श्रीनिवास सोसायटी, आकाशदीप सोसायटी, शांतीसागर सोसायटी, साईनाथ सोसायटी व नर्मदा सोसायटी
पाली-देवद ग्रामपंचायत हद्दीतील प्रथमदर्शनी निदर्शनास आलेल्या धोकादायक इमारतींच्या अध्यक्ष, सचिव यांना ग्रामपंचायतीमार्फत पत्र देऊन आपापल्या इमारतीचे स्ट्रक्चर आॅडिट करून घेण्याविषयी कळविले आहे. अशा स्वरूपाच्या धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चर आॅडिट करून त्या पाडणे आवश्यक असल्यास तशी यंत्रणा ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नसल्याने तसेच इमारत पाडण्याचे अधिकार ग्रामपंचायतीस नसल्याने या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याबाबतचे पत्र सिडको व्यवस्थापनाकडे दिलेले आहे. १० जानेवारी २०१३ रोजीच्या अधिसूचनेनुसार पाली-देवद ग्रामपंचायत ही नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्रात समाविष्ट झाल्याने ग्रामपंचायत हद्दीत बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार सिडको प्रशासनाचे आहेत.
- नंदिकशोर भगत, ग्रामसेवक, पाली-देवद ग्रामपंचायत
पाली-देवद व शिलोत्तर रायचूर येथे सुमारे ३५ ते ४० वर्षांपूर्वीच्या जुन्या इमारती आहेत. सदरच्या इमारतींना ग्रामपंचायतीने स्ट्रक्चर आॅडिट करण्याच्या नोटीस पाठवल्या आहेत; परंतु हे स्ट्रक्चर आॅडिट ग्रामपंचायत मार्फत करून देणे गरजेचे आहे. स्ट्रक्चर आॅडिट करून मगच सदरच्या इमारती धोकादायक आहेत की नाही, हे ठरवण्यात यावे. ग्रामपंचायतीने सदरच्या इमारतीचा अहवाल लवकरात लवकर तयार करून शासनाकडे पाठवावा, तसेच शासनाने इमारतीचा व येथे राहणाऱ्या रहिवाशांचा विचार करून वाढीव एफएसआय मिळाल्यास रिडेव्हलपमेंट होणे शक्य होईल.
- अॅड.चेतन केणी, सुकापूर
‘नैना’ला आमचा विरोध नाही, येथील इमारती नादुरु स्त झालेल्या आहेत. त्यामुळे ‘नैना’ने या इमारतींच्या पुनर्विकासाचा विचार करायला हवा.
- अमित जाधव,
सदस्य,
जिल्हा परिषद