रोहा : रोहा-कोलाड या मुख्य मार्गावरील धाटाव परिसरात सध्या अनधिकृत बांधकाम जोरात सुरू आहे. स्थानिक पुढाऱ्यांच्या कृपाशीर्वादाने काही कार्यकर्त्यांनी सरकारी भूखंडावर बेकायदेशीर गाळे बांधून व ते परस्पर विकून लाखो रुपयांचा मलिदा लाटण्याचा दुर्दैवी प्रकार घडत आहे. असे असताना काही दिवसांपूर्वी या मार्गावरील मोकळ्या जागेत पुन्हा एकदा स्थानिक पुढाऱ्यांनी अनधिकृत बांधकामांना सुरुवात केली. रोहा सार्वजनिक बांधकाम खात्याकडून ४७ अनधिकृत गाळेधारकांना हे अनधिकृत बांधकाम पाडण्याची नोटीस बजावली आहे, अशी माहिती रोहा सा. बां. खात्याचे शाखा अभियंता गाडगे यांनी दिली.रोहे तालुक्यातील धाटाव एमआयडीसी प्रवेशद्वाराजवळ सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मालकाची जागा आहे. धाटाव एमआयडीसीच्या मालकीचा ट्रक टर्मिनल्स (पार्किंग क्षेत्र) प्रत्यक्षात जागेवरून गायब झाला आहे. या पार्किंग क्षेत्रावर एक बडी कंपनी बांधण्याचा प्रताप काही जणांनी केला आहे. यात बड्या नेत्यांचा हात आहे. कंपनीत येणारा व जाणारा कच्चा व पक्का माल आयात-निर्यात करण्यासाठी असलेली पार्किंगची आरक्षित जागा गिळंकृत केल्याने सध्या कंपनीतील बहुतांश गाड्या धाटाव मार्गावरील दोन्ही बाजूस उभ्या असतात. यामुळे वाहतुकीवर परिणाम होत आहे. किंबहुना त्या मार्गावर अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. यामार्गावर अपघातात अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. असे असताना या ठिकाणी राजरोसपणे सरकारी जागेवर अतिक्र मण होत आहे. ही मोठी चिंतेची बाब आहे. बड्या पुढाऱ्यांना हाताशी धरून एकाने अनधिकृत बांधकामांचे चक्क दुकानच थाटले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून उशिरा का होईना येथील ४७ अनधिकृत गाळेधारकांना रीतसर नोटीस बजावून सात दिवसांत अनधिकृत बांधकाम हटविण्याचा आदेश देण्यात आले आहे. येथील अतिक्र मण न हटविल्यास हे अतिक्र मणावर हटविण्याची कारवाई करण्यात येईल, असे गाडगे यांनी सांगितले आहे. (वार्ताहर)
धाटावमध्ये अनधिकृत गाळेधारकांना नोटिसा
By admin | Published: January 13, 2017 6:16 AM