आता खारघर हिलवरही पर्यटकांना प्रवेशबंदी

By admin | Published: June 15, 2017 03:14 AM2017-06-15T03:14:12+5:302017-06-15T03:14:12+5:30

मोठ्या प्रमाणावर खारघर शहराला नैसर्गिक साधनसंपदा लाभली आहे. पांडवकडा धबधबा, खारघर हिल, सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा खारघर शहरात समावेश

Now the entry of tourists to Kharghar Hill | आता खारघर हिलवरही पर्यटकांना प्रवेशबंदी

आता खारघर हिलवरही पर्यटकांना प्रवेशबंदी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : मोठ्या प्रमाणावर खारघर शहराला नैसर्गिक साधनसंपदा लाभली आहे. पांडवकडा धबधबा, खारघर हिल, सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा खारघर शहरात समावेश असल्याने याठिकाणी वातावरण नेहमी आल्हाहदायक असते. सिमेंटच्या जंगलात अशा प्रकारचे नैसर्गिक सौंदर्य हे प्रत्येकाला हवेहवेसे वाटते, मात्र पावसाळ्यात खारघर शहरातील विविध पर्यटन क्षेत्रावरील बंदी ही पर्यटकांचा हिरमोड करीत असते. पांडवकडा धबधब्यावर वनविभागाने बंदी घातल्यानंतर खारघर हिलवर देखील १५ जूनपासून प्रवेशबंदीचा निर्णय सिडकोने घेतला आहे.
खारघर हिल हे खारघरमध्ये सिडकोने विकसित केलेले ठिकाण आहे. या हिलवर चाफेवाडी, फणसवाडी या दोन आदिवासी वाड्या आहेत. येथे जाण्यासाठी सिडकोने डांबरी रस्ता तयार केलेला आहे. सुमारे चार-पाच किलोमीटरचा प्रवास करून खारघर हिल गाठावी लागते. या हिलवरून नवी मुंबई, मुंबई, पनवेल शहराचे विहंगम दृश्य नजरेस पडते. त्यातच खारघर हिलवरील वातावरण, नैसर्गिक साधनसंपदा, दुर्मीळ पक्षी, प्राणी आदींसह याठिकाणच्या आदिवासी संस्कृतीची ओळख याठिकाणी गेल्यावर पाहावयास मिळते.
खारघर, सीबीडीमधील रहिवासी जॉगिंग, मेडिटेशन, योग करण्यासाठी मोठ्या प्रमाणात देखील येत असतात. मात्र पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या शक्यतेमुळे सिडको जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत खारघर हिल बंद ठेवण्याचा निर्णय घेते. १५ जून ते १५ सप्टेंबर हे तीन महिने याठिकाणी प्रवेशबंदी असते. सिडकोने या सूचनेचा फलक देखील खारघर हिलच्या प्रवेशद्वाराजवळ लावला आहे. मात्र सिडकोच्या या धोरणामुळे पर्यटकप्रेमी नाराज आहेत.
पावसाळ्यात खारघर हिलवरील हिरवळ, मान्सूननंतरचा शहरावर पसरलेली धुक्याची चादर हे दृश्य अतिशय मनमोहक असते. याठिकाणच्या बंदीमुळे पर्यटकांना या सर्व गोष्टीपासून मुकावे लागते. यासंदर्भात खारघरमधील स्थानिक नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्या खारघर हिलमधील चाफेवाडी व फणसवाडी याचा प्रभाग क्र मांक पाचमध्ये समावेश होतो. माझ्या प्रभागातील या पर्यटन क्षेत्रात बाराही महिने पर्यटकांना प्रवेश असावा अशी सर्वांचीच भावना आहे.
दरडी कोसळत असतील तर अशा ठिकाणी सिडकोने योग्य त्या उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. या गोष्टीचा आधार घेत पर्यटकांना प्रवेशबंदी करणे योग्य नसून यासंदर्भात मी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र लिहिणार असून काही अटी व शर्तीच्या आधारावर पर्यटकांना प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी करणार असल्याचे सांगितले.

Web Title: Now the entry of tourists to Kharghar Hill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.