नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : वर्सोवा-विरार सागरी सेतूचा थेट पालघरपर्यंत विस्तार करण्याच्या आता ‘एमएमआरडीए’ने हालचाली सुरू केल्या आहेत. यापूर्वी वरळी ते वांद्रेनंतर वांद्रे ते वर्सोवा आणि वर्सोवा ते विरार असा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्याचा निर्णय ‘एमएमआरडीए’ने घेतला हाेता; तसेच याच मार्गाचा पुढे पालघरपर्यंत विस्तार करण्याची घोषणा केली हाेती. ही घोषणा आता प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी आता विस्तारित विरार ते पालघरपर्यंतचा सी-लिंकचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासह वर्सोवा ते विरार मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे पुनरावलोकन करण्यासाठी सल्लागार नेमण्यासाठी मंगळवारी निविदा मागविल्या. हा प्रत्यक्षात पूर्ण झाल्यास नरिमन वरळीहून थेट पालघरपर्यंत विना अडथळा समुद्रमार्गे प्रवास करता येणार आहे.
यापूर्वी वांद्रे ते वरळीदरम्यान ५.६ किलीमीटर लांबीचा एक सी-लिंक २०१० मध्ये तयार झाला असून, त्यावरून रोज हजारो वाहने ये-जा करतात. तर, वांद्रे ते वर्सोवापर्यंतच्या १७ किमीच्या सी-लिंकचे काम प्रगतिपथावर आहे; तसेच वर्सोवा ते विरार मार्गासाठी थेट जपानच्या जायका संस्थेने कर्ज देण्यास मान्यता दिली आहे. ही मार्गिका एकूण ४२.७५ किमी आहे. तिचा खर्च ३१,४२६ कोटींवरून थेट ६३४२४ कोटींवर गेला आहे. हाच मार्ग आता पुढे पालघरपर्यंत वाढविण्यात येणार आहे. सध्या रस्ता मार्गे विरार ते पालघर ५४.६ किमी अंतर आहे. हा सागरी सेतू पालघरपर्यंत वाढविण्यास मार्च २०२३ झालेल्या १५४ बैठकीत मान्यता देण्यात आली होती.
वर्सोवा-विरार सी-लिंक चार ठिकाणी जोडणार
सध्या प्रगतिपथावर असलेल्या वर्सोवा-विरार मार्गावर मार्गिकेवर चारकोप; मीरा-भाईंदर; वसई व विरार, अशा चार ठिकाणी हा सी-लिंक जोडला आहे. हा सागरी सेतू किनाऱ्यापासून एक किलोमीटरवर असेल. अंधेरी पश्चिम ते विरारला ही मार्गिका संलग्न करेल. गोराई, उत्तन, वसई व विरार येथे चार टोल प्लाझा असतील; तसेच या मार्गिकेपासून वसईपर्यंत १८.४६ किमीचा विशेष रस्ताही प्रस्तावित आहे.
मढ आयर्लंडसह गोराई बीचला लाभ
प्रस्तावित वर्साेवा-विरार सी-लिंक हा मढ आयलंड, गोराई बीच, आगाशी रोड येथे कनेक्ट करण्यात येणार असून, मनोरी येथील खाडी पूल याचाच भाग असणार आहे.
भाईंदर-वसई खाडी पुलासही फायदा
विस्तारित सागरी सेतूचा ‘एमएमआरडीए’च्या प्रस्तावित मुंबई शहर आणि वसई-विरार प्रदेशाच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या खाडी पुलासही मोठा फायदा होणार आहे. या पुलावर ‘एमएमआरडीए’ने १००८१ कोटी ६० लाख रुपये खर्च प्रस्तावित केला आहे. याळे दोन्ही शहरांतील अंतर तब्बल ३० किमीने कमी होऊन आठ लाख रहिवाशांसह मुंबई-गुजरात प्रवास करणाऱ्या लाखो वाहनचालकांना त्याचा फायदा होणार आहे. खाडीवरील हा पूल पाच किमी लांबीचा राहणार असून तो ३०.६ मीटर रुंद असा सहापदरी राहणार आहे.